दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलचे सीईओ सुनील मित्तल (Sunil Mittal) यांनी व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea) मोठं वक्तव्य केलं आहे. दावोसमध्ये (Davos 2024) कंपनीच्या सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. व्होडाफोन-आयडियाला मोठ्या रकमेची तातडीची गरज आहे, परंतु त्याची व्यवस्था होत नसल्यामुळे कंपनी आपलं अस्तित्व गमावत चालली आहे, असं ते यावेळी म्हणाले.
स्पर्धेत राहण्यासाठी इतक्या रकमेची गरज
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे ५४ व्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) एअरटेलच्या सुनील भारती मित्तल यांनी सहभाग घेतला. मोठ्या रोखीचा तुटवड्याचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडियाला एका गुंतवणूकदाराची मोठी गरज आहे. टेलिकॉम कंपनीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुमारे ९ अब्ज डॉलर्सची भांडवल लागेल, परंतु दुर्दैवाने, गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे शक्य झालेलं नाही, असं मित्तल म्हणाले.
केंद्राच्या मदतीनंतही मागे पडली कंपनी
दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन-आयडियाला केंद्र सरकारचा पाठिंबा होता, मात्र तरीही ती सातत्यानं मागं पडत आहे, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. मला सांगताना दुःख होतंय की त्यांचं आता अस्तित्व नाही, असं मित्तल कंपनीच्या सद्यस्थितीबद्दल आणि भविष्याबद्दल चिंता व्यक्त करताना पुढे म्हणाले. सध्या तीन खासगी आणि एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ही स्पर्धा उत्तम आहे. बीएसएनएल आता दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाचं स्थान निर्माण करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
DFC कडूनही हाती निराशाच
बिझनेस टुडे वर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, व्होडाफोन-आयडियाला 5G नेटवर्कसाठी OpenRAN आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी अमेरिकेच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून (DFC) निधी मिळवण्यात अपयश आलं आहे. डीएफसी ही अमेरिकन सरकारची विकास वित्त संस्था आहे, जी अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते. दरम्यान, ३३.१ टक्के हिस्स्यासह केंद्र सरकार व्होडाफोन-आयडियामधील सर्वात मोठे भागधारक आहे.