Join us  

BharatPe Ashneer Grover : गुंतवणूकदारांचा माझ्यावर दबाव; राजीनामा देताना अशनीर ग्रोव्हरनं फोडला 'लेटर बॉम्ब', काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 1:58 PM

'भारतपे'मध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी तत्काळ प्रभावाने फिनटेक फर्ममधून राजीनामा दिला.

BharatPe Ashneer Grover : 'भारतपे'मध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी तत्काळ प्रभावाने फिनटेक फर्ममधून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले होतं. यानंतर लगेच अशनीर ग्रोव्हर यांच्या राजीनाम्याचं वृत्त समोर आलं आहे. आपला राजीनामा देताना गुंतवणूकदारांचा आपल्यावर दबाव असल्याचंदेखील म्हटलं आहे. 

अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या कंपनीतून राजीनामा दिला आहे, असं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं मंगळवारी दिलं. त्यांनी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि बोर्ड डायरेक्टर या पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी लिहिलेलं एक पत्रही समोर आलंय. "मी आज जड मनानं लिहित आहे. मी जी कंपनी उभी केली, आज त्याच कंपनीमधून मला बाहेर जाण्याचा दबाव टाकला जात आहे. आज ही कंपनी फिनटेकच्या जगात एक लीडर म्हणून उभी आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो," असं अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.

"२०२२ च्या सुरूवातीपासूनच मला तथ्य नसलेले आरोप माझ्यावर केले जात आहेत. माझ्यावर माझ्या कुटुंबावर आरोप केले जात आहेत. ते आज केवळ मलाच नाही, तर ज्या कंपनीला वाचवण्याचा दावा करत आहेत, त्याच कंपनीच्या प्रतिष्ठेलाही नुकसान पोहोचवत आहेत," असं त्यांनी नमूद केलं. आंत्रप्रेन्योरिशप चेहरा बनल्यानंतर आता आपण एकटेच मोठी लढाई लढत आहोत. यामध्ये आपल्या विरोधात गुंतवणूकदार आणि मॅनेजमेंट उभं आहे. परंतु दुर्देवानं मॅनेजमेंटनं ते गमावलंय आणि आणि 'भारतपे' पणाला लागलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

लवादानं याचिका फेटाळलीआर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’चे अडचणीत सापडलेल्या अशनीर ग्रोव्हर यांना सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवादातून कोणताही दिलासा मिळाला नव्हता.  सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली. यानंतरच अशनीर ग्रोव्हर यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. ग्रोव्हर यांनी एसआयएसीमध्ये याचिका दाखल करत बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळल्यानंतर ‘भारतपे’चे  बोर्ड आर्थिक अनियमितता आणि प्रशासनातील त्रुटींची चौकशी करत राहणार आहे.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक