तुम्ही शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा शो नक्कीच पाहिला असेल. यामध्ये अनेक व्यवसायातील दिग्गज शार्क आहेत. यातील सर्वांचं लक्ष वेधून घेणारे म्हणजे भारतपे (BharatPe) चे को फाऊंडर आणि एमडी अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover). गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे या शो मुळे नाही, तर अन्. कारणामुळे. आपली कंपनी आपल्याला कंपनी संचालक मंडळातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप अशनीर यांनी केला आहे.
कोटक सिक्युरिटीजच्या एका कर्मचाऱ्यासोबत ऑडियो क्लिप सार्वजनिक झाल्यानंतर गोव्हर यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत. हे प्रकरण मोठं झाल्यानंतर ग्रोव्हर यांना तीन महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. परंतु हा वाद आताही थांबताना दिसत नाही. आपल्या कंपनीचे गुंतवणूकदार आपल्या विरोधात गेले असून आता ते आपल्याला कंपनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. असं असलं तरी अशनीर ग्रोव्हरही झुकण्यास तयार नाहीत. आपल्याला कंपनीत परत घेतलं जावं किंवा हे शक्य नसल्यास आपल्याला ४ हजार कोटी रुपये दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतरच आपण कंपनीतून बाहेर पडू असंही त्यांनी सांगितलं. मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, हे त्यांच्या कंपनीत असलेल्या हिस्स्याचं मूल्य आहे. कंपनीत त्यांची ९ टक्के भागीदारी आहे.
'ऑडियोमधील आवाज माझा नाही'"ऑडियोमधील आवाज हा आपला नाही. मी कधीही अशा चर्चेचा भाग राहिलो नाही. मार्केटमध्ये असे अनेक जण आहेत जे आपल्यावर जळतात. कोणी व्यक्ती इतक्या कमी वेळात इतका मोठा व्यवसाय कसा उभे करू शकते आणि इतकं यशस्वी कसं होऊ शकते असं त्यांना वाटतं. परंतु गेल्या १०-१२ वर्षांपासून मी प्रयत्न करत आहे आणि याच सर्व गोष्टीतून हा वाद उभा राहिला आहे. ही ऑडियो क्लिप बनावट आहे," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले.
भारतपे ही अशी कंपनी आहे ज्यानं मर्चंट डिस्काऊंट रेट शून्यावर आणला. यापूर्वी कंपन्या यातून पैसा कमवत होत्या. लोन देणं हादेखील मोठा व्यवसाय आहे, हे देखील आमच्या लक्षात आलं. यानंतर आमची स्थिती पूर्वीपेक्षाही सक्षम झाली. असं काही व्यवसाय आहेत, जे पेमेंट्समधून कर्ज देण्यात अयशस्वी ठरलेत. आम्ही नंतर बाय नाऊ पे लेटर सेवा सुरू केली. यानंतर पी टू पी लेंडिंग आणि बॉरोइंग सुरू केलं. दुसऱ्या लोकांना हे करता आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला बँक लायसन्स मिळाला यामुळे अनेक लोकांना हे खटकू लागल्याचंही ते म्हणाले.
गैरव्यवहार केला का?हे बनावट वृत्त आहे. ही साडेतीन वर्षे जुनी कंपनी आहे. चार सर्वात मोठ्या ऑडिट कंपन्यांपैकी एक असलेल्या डेलॉइटने याचे ऑडिट केले आहे. २०२१ या आर्थिक वर्षाचे ऑडिट करण्यात आले आहे. कंपनीच्या संचालक मंडळात १० गुंतवणूकदारांपैकी चार प्रतिनिधींचा समावेश आहे. त्याचे स्वतंत्र संचालक आहेत. रजनीश कुमार आणि केवल हांडा अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी एक एसबीआयचे माजी अध्यक्ष आणि दुसरे युनियन बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे तुम्ही काही चुकीचे आहे असे म्हणत असाल तर तुम्ही माझ्याकडे बोट दाखवत नाही. तुम्ही संचालक मंडळावर प्रश्न उपस्थित करत आहात. डेलॉइटच्या ऑडिटवर शंका घेत आहोत का,? असा सवालही अशनीर यांनी केला. टेम्पररी लीव्ह ऑफ अॅबसेन्सवर पाठवण्याचा अर्थ काय आहे? याची व्याख्या काय करण्यात आलीये. आमच्या शेअर होल्डरच्या करारातही हे नाही. एम्पलॉयमेंट करारतही हे नाही तर हे आलं कुठून असा सवालही त्यांनी केला.