नवी दिल्ली: सर्वाधिक सक्रिय ग्राहकांच्या संख्येत भारती एअरटेलनंरिलायन्स जिओला मागे टाकलं आहे. जूनमध्ये रिलायन्स जिओ इन्कोकॉमनं २१ लाख मोबाईल ग्राहक गमावले. तर व्होडाफोन आयडियाला सर्वाधिक नुकसान सोसावं लागलं. जूनमध्ये कंपनीनं ३७ लाख ग्राहक गमावले. भारतीय टेलिफोन नियामक प्राधिकरणानं (ट्राय) याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
एअरटेलच्या सक्रिय ग्राहकांची संख्या वाढून ती ३१ कोटी १० लाखांवर गेली आहे. एअरटेलनं जिओला थोड्या अंतरानं मागे टाकलं आहे. जिओच्या सक्रिय ग्राहकांची संख्या ३१ कोटी इतकी आहे. तर व्होडाफोन आयडियाच्या सक्रिय ग्राहकांची संख्या २७ कोटी ३० लाख इतकी आहे. मे महिन्यात जिओ पहिल्या स्थानावर होतं. मात्र जूनमध्ये एअरटेलनं जिओला मागे टाकलं. त्यामुळे आता एअरटेल देशात पहिल्या स्थानी आहे.
व्हिजिटर लोकेशन रजिस्टरच्या (व्हीएलआर) माध्यमातून सक्रिय ग्राहकांची संख्या मोजली जाते. ट्रायच्या आकडेवारीनुसार, एअरटेलचे ९८.१४ टक्के ग्राहक सक्रिय आहेत. तर व्होडाफोन आयडियाच्या सक्रिय ग्राहकांचं प्रमाण ८९.४९ टक्के इतकं आहे. याबाबतीत जिओ दोन्ही कंपन्यांपेक्षा बरीच मागे आहे. जिओचे सक्रिय ग्राहक ७८.१५ टक्के आहेत.
जूनमध्ये देशातील सक्रिय मोबाईल सेवा ग्राहकांची संख्या ९५ कोटी ८० लाख इतकी होती. मेच्या तुलनेत जूनमध्ये सक्रिय ग्राहकांची संख्या २८ लाखांनी घटली. याचा फटका जिओ आणि व्होडाफोन आयडियाला बसला. मात्र याच कालावधीत जिओनं ग्रामीण भागात मोठा विस्तार केला. जिओनं ग्रामीण भागातील व्होडाफोन आयडियाचं वर्चस्व मोडून काढलं. ग्रामीण भागात जिओचे १६ कोटी २३ लाख ग्राहक आहेत. तर व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या १६ कोटी ६ लाख इतकी आहे.
रिलायन्स जिओला मोठा धक्का; चुरशीच्या स्पर्धेत एअरटेलची बाजी
जूनमध्ये जिओ, व्होडाफोन-आयडियाला फटका
By कुणाल गवाणकर | Published: September 25, 2020 07:03 PM2020-09-25T19:03:08+5:302020-09-25T19:04:12+5:30