Airtel 5G: भारतातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहिच्या निकालांची घोषणा केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ५० टक्क्यांनी वाढून ३,००६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यानंतर आता एअरटेल कंपनीने आपल्या ५जी सेवेचा विस्तार करण्यासाठी मेगा प्लान आखल्याचे सांगितले जात आहे. देशभरातील जवळपास प्रत्येक शहर आणि गावांपर्यंत ५जी सेवा पोहोचवण्याचे ध्येय एअरटेल कंपनीने ठेवले आहे. यासाठी कंपनी सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलची 5G सेवा राज्यातील ५०० हून अधिक शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध आहे. या शहरांमध्ये कोईम्बतूर, मदुराई, त्रिची, तिरुपूर, वेल्लोर, होसूर आणि सेलम यांचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये आमच्या 5G नेटवर्कवरील ग्राहकांची संख्या २० लाखांच्या पार गेली आहे. देशात हे हाय-स्पीड नेटवर्क सुरू करणारी ही पहिली कंपनी असल्याचा दावा भारती एअरटेलने केला आहे.
अवघ्या सात महिन्यांत ही वाढ झाली आहे
या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील कंपनीच्या 5G नेटवर्कवरील ग्राहकांची संख्या २० लाखांवर पोहोचली होती. सर्व क्षेत्रात 5G कव्हरेज असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर आहे. मुंबईव्यतिरिक्त नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरचाही समावेश आहे. भारती एअरटेलने मुंबईतील 5G नेटवर्कवर २० लाख ग्राहकांचे स्वागत केले आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून अवघ्या सात महिन्यांत ही वाढ झाली आहे.
दरम्यान, अलीकडेच एअरटेलने देशभरातील आपल्या नेटवर्कवर एक कोटीहून अधिक ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. 5G सेवा २०० दिवसांपेक्षा कमी कालावधीत देशातील ६०० जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. गेल्या वर्षी देशात 5G सेवा सुरू करण्यात आली होती. रिलायन्स जिओ आणि एअरटेल वेगाने त्यांचे नेटवर्क वाढवत आहेत.