भारतातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहिच्या निकालांची घोषणा केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 50 टक्क्यांनी वाढून 3,006 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एअरटेलला गेल्या वर्षी याच तिमाहीत 2,008 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याशिवाय कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत 89 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी एनएससीवर भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये 1.44 टक्क्यांची घसरण झाली आणि तो 785.60 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, कंपनीच्या बोर्डाने 4 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
महसूलात १४ टक्क्यांची वाढ
मार्च तिमाहीत भारती एअरटेलचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 36,009 कोटी रुपये होता. जो वर्षापूर्वीच्या 31,500 कोटी रुपयांच्या तुलनेत 14 टक्क्यांनी अधिक आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत महसूल 1 टक्क्यांनी वाढला असल्याचं कंपनीनं एक्सचेज फायलिंगमध्ये म्हटलंय.
या तिमाहीत कंपनीचा एकत्रित EBITDA 18807 कोटी रुपये होता, जो वार्षिक आधारावर 18 टक्के आणि तिमाही आघारावर एका टक्क्यांनी अधिक आहे. चौथ्या तिमाहीत EBITDA मार्जिन 52.2 टक्के होते, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 50.8 टक्के आणि मागील तिमाहीत 52.0 टक्के होते. हा तिमाहिचा निकाल आमच्यासाठी आणखी मजबूत तिमाही निकाल होता. आम्ही आर्थिक वर्षाच्या अखेरिस आमचा पोर्टफोलियो मजबूत केला असल्याची माहिती भारती एअरटेलचे एमडी गोपाल विट्टल यांनी दिली.