सुनील मित्तल यांची भारती एअरटेलटाटा समूहातील सर्वात मोठी डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) कंपनी टाटा प्ले विकत घेण्याच्या तयारीत आहे. टाटा प्लेच्या खरेदीमुळे भारती एअरटेलचा डिजिटल टीव्ही सेगमेंट मजबूत होऊ शकतो. याच उद्देशानं भारती एअरटेल टाटा प्ले विकत घेण्यासाठी टाटा समूहाशी बोलणी करत आहे.
याआधीही टाटा समूह आणि भारती एअरटेल यांच्यात एक करार झाला होता. हा व्यवहार २०१७ मध्ये झाला होता, ज्यात भारती एअरटेलनं टाटा समूहाचा कन्झ्युमर मोबिलिटी बिझनेस विकत घेतला होता.
टियर १ आणि टियर २ शहरांमधील ग्राहक डीटीएचऐवजी होम ब्रॉडबँडवर ओव्हर-द-टॉप (ओटीटी) पॅकमध्ये अपग्रेड होत आहेत आणि स्वस्त ऑनलाइन पर्यायांसाठी केबल कनेक्शन काढत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण ग्राहक दूरदर्शनच्या फ्री डिशला पसंती देत आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चेला वेग आला असून लवकरच औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असल्याचं काहींनी सांगितले. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. दरम्यान, टाटा समूहानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टाटा सन्सचा ७० टक्के हिस्सा
टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सची सध्या टाटा प्लेमध्ये ७० टक्के मालकी आहे. एप्रिल मध्ये टाटा सन्सनं सिंगापूरस्थित टेमासेक होल्डिंग पीटीई या गुंतवणूक कंपनीचा १० टक्के हिस्सा ८३५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. यामुळे कंपनीचे मूल्य १ अब्ज डॉलर इतकं झालं. कोरोनाच्या महासाथीपूर्वी कंपनीचं मूल्यांकन ३ अब्ज डॉलर्स होतं. तर वॉल्ट डिस्नेकडे कंपनीचा ३० टक्के हिस्सा आहे.