Bharti Hexacom IPO: नवीन आर्थिक वर्षाच्या (FY25) पहिल्या आयपीओनं (IPO) धमाकेदार एन्ट्री घेतलीये. शेअर बाजारात जोरदार विक्रीचा सपाटा सुरू असताना भारती हेक्साकॉमच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. हा शेअर बीएसईवर 755.20 रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाला आहे. तर NSE वर शेअर 755 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट झाला. या इश्यूची किंमत 570 रुपये होती. म्हणजेच स्टॉक लिस्ट होताच गुंतवणूकदारांनी 32.5 टक्के इतका मोठा नफा कमावलाय. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलची उपकंपनी असलेल्या भारती हेक्साकॉमचा पब्लिक इश्यू (Bharti Hexacom Share Price) अखेरच्या दिवशी जवळपास ३० पट सबस्क्राईब झाला होता.
भारती हेक्साकॉमचा 4275 कोटी रुपयांचा आयपीओ 3 ते 5 एप्रिल दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या IPO ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि एकूण 29.88 पट सबस्क्राइब झाला. यामध्ये, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा 48.57 पट सबस्क्राईब झाला होता, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा (NII) 10.52 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा 2.83 पट सबस्क्राईब झाला.
कंपनीचे एकमेव पब्लिक शेअरहोल्डर असलेल्या टेलिकॉम कन्सल्टंट्सने आयपीओद्वारे आपला हिस्सा 15 टक्क्यांनी कमी केलाय. टेलिकॉम कन्सल्टन्सनं प्रत्येकी 5 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 7.50 कोटी शेअर्स विकले आहेत. प्रमोटर भारती एअरटेलचा कंपनीत 70 टक्के हिस्सा आहे. भारती हेक्साकॉमची स्थापना 1995 मध्ये झाली होती. राजस्थान आणि ईशान्य भारतातील टेलिकॉम सर्कलमध्ये फिक्स्ड लाइन टेलिफोन आणि ब्रॉडबँड सेवा पुरवते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)