ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ (Ola Electric IPO) शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर्सचं लिस्टिंग फ्लॅट झालं असलं तरी नंतर यामध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. बघता बघता कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वधारला. हा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाल्यानं कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) अब्जाधीश झाले.
भाविश यांची संपत्ती इतकी वाढली की देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत त्याचं नाव समाविष्ट झालं. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार भाविश यांची संपत्ती दुप्पट होऊन २.६ अब्ज डॉलर्स (२१.८३ हजार कोटी रुपये) झाली आहे. आयपीओपूर्वी त्यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स होती. भाविश यांचं नाव आता ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण अब्जाधीशांच्या यादीत सामील झालं आहे.
शुक्रवारी झालं लिस्टिंग
ओला इलेक्ट्रिक शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. कंपनीच्या शेअरची इश्यू प्राइस ७६ रुपये होती. त्याचं लिस्टिंगही ७६ रुपयांवर झाली होती. मात्र, लिस्टिंगनंतर लगेचच त्यात १६ टक्क्यांची वाढ दिसून आली. संध्याकाळी बाजार बंद झाला तेव्हा त्याच्या शेअर्समध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली होती. शेअर ९१.१८ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी चांगला नफा कमावला.
भाविश यांच्याकडे किती हिस्सा?
भाविश यांच्याकडे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा वाटा होता. त्यांनी ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे ३७,९१५,२११ शेअर्स ७६ रुपये प्रति शेअर दरानं विकले. त्यानंतर त्यांच्याकडे १,३२,३९,६०,०२९ शेअर्स शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा ओला इलेक्ट्रिकच्या शेअरचा भाव ९१.१८ रुपये होता. अशात भाविश यांच्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत १२,०७१ कोटी रुपये आहे.
ओला इलेक्ट्रिकची स्थापना ७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ मध्ये झाली होती. स्थापनेनंतर दोन वर्षांनी आणि एकही स्कूटर शिप न करता ओला इलेक्ट्रिक युनिकॉर्न कंपनी बनली होती. युनिकॉर्न म्हणजे एक स्टार्टअप ज्याचं मूल्यांकन एक अब्ज डॉलर आहे. ही कंपनी युनिकॉर्न होण्याचं सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीला सॉफ्टबँक आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट सारख्या कंपन्यांकडून सुरुवातीचं फंडिंग मिळालं होतं. मार्च २०२३ मध्ये कंपनीला १४.७ अब्ज रुपयांचा तोटा झाला होता.