Lok Sabha Election Share Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील NDA सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. एनडीए सरकारच्या पुनरागमनामुळे अदानी ग्रुपच्या शेअर्सना पुन्हा गती मिळाली आहे. इतकेच नाही, तर अदानी ग्रुपने ज्या कंपनीसोबत करार केला आहे, त्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ होताना दिसत आहे. सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या शेअर्समध्येही जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच भेलच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांहून अधिक वाढ आली.
अदानी ग्रुपमधील कंपनी अदानी पॉवरने 5 जून रोजी सरकारी कंपनी भेलला 3,500 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याची घोषणा केली. छत्तीसगडमधील रायपूर येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे 6 जून रोजी गुंतवणूकदारांनी भेलचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गर्दी केली. काही मिनिटांतच कंपनीच्या शेअरमध्ये 14.60 टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली. कंपनीचे शेअर्स BSE वर 292.45 रुपयांवर आले, तर NSE वर 292.35 रुपयांवर व्यवहार करत होते. यासोबतच अदानी पॉवरच्या शेअर्सनेही 8 टक्क्यांची उसळी घेतली आणि किंमत 782.30 रुपयांवर पोहोचली.
भेलने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरने प्रत्येकी 800 मेगावॅटचे दोन ऊर्जा प्रकल्प बांधण्याचे कंत्राट दिले आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला बॉयलर, टर्बाइन, जनरेटर आणि सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानाचा पुरवठा करायचा आहे. यापैकी युनिट एक 35 महिन्यांत आणि युनिट दोन 41 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.
दरम्यान, ब्रोकरेज हाऊस नुवामाचे म्हणणे आहे की, आगामी काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 रुपयांच्या पुढे जाईल. कारण येत्या 2 ते 3 वर्षात औष्णिक ऊर्जा क्षेत्र तेजीत येईल आणि कंपनीला बरीच कंत्राटे मिळतील. अनेक प्रकल्प आधीच पाइपलाइनमध्ये आहेत, ज्यामुळे शेअर्सचाही फायदा होईल. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 370 रुपयांची टार्गेट किंमत दिली आहे.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)