मुंबई - लॉकडाऊन काळात डिजिटल पेमेंटपद्धतीवर भर देण्याचं सरकारने सूचवलं. खरेदी-विक्री व्यवहारात नोटांऐवजी डिजिटल ट्रान्जेक्शन करण्याचे आवाहनही करण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन व्यवहार आणि ऑनलाईन पेमेंट ही संकल्पना रुजल्याचं दिसून आलं. या कालावधीत मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहारही झाले. गुगल पे, पेटीएम, फोन पे आणि भारत सरकारने लाँच केले भीम अॅप नागरिकांसाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म ठरले. मात्र, सरकारने लाँच केलेल्या या भीम अॅपबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयवर आधारित असलेल्या भीम अॅपद्वारे ऑनलाईन आणि कॅशलेस व्यवहार सहज आणि सोपा झाला आहे. मात्र, युजर्संची खासगी माहिती अडचणीत आली आहे. इस्रायली सिक्युरिीटी फर्म (vpnmentor) ने आपल्या एका अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतातील भीम अॅप वापरणाऱ्या जवळपास ७० लाख युजर्संचा खासगी डेटा लीक झाला आहे. ज्यावेळी, भीम अॅपवर हा डेटा अपलोड करण्यात येत होता, त्याचवेळी हा डेटा लीक झाल्याचे या संस्थेनं म्हटलं आहे.
सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार, एकूण ४०९ जीबी डेटा लीक झाला आहे. त्यामध्ये, युजर्संचे आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, बँक रेकॉर्डसह त्यांच्या फ्रोफाईलच्या माहितीचा समावेश आहे. या अहवालानुसार, ज्या वेबसाईटमधून हा डेटा लीक झाला, त्याचा वापर भीम अॅपच्या प्रचारातील कॅम्पेनसाठी करण्यात आला होता. त्यावेळी, भीम अॅपचे बिझनेस मर्चंट्स आणि युजर्संना अॅपसोबत जोडलं जात होतं. डेटा अपलोडिंग करतेवळी, काही डेटा अमेझॉन वेब सर्व्हीस एस ३ बकेट मध्ये स्टोअर होत होता, जो सार्वजनिक झाला आहे. सन २०१९ मधील फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया झाल्याचंही फर्मने म्हटलं आहे.
भीम अॅप युजर्संचा हा डेटा लीक झाल्यामुळे हॅकर्सकडे युजर्संची खासगी माहिती पोहचली आहे. त्यामुळे युजर्संना हॅकर्सकडून शिकार बनवलं जाऊ शकतं. मात्र, एप्रिल महिन्यात ही बाब ठीक करण्यात आली आहे. पण, ज्यांचा डेटा लीक झाला आहे, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. याबाबत, भीम अॅप निर्माण करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन आणि कॉम्प्युटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीमकडून यासंदर्भात काहीही स्टेटमेंट देण्यात आलं नाही.