Deloitte Layoffs: गेल्या काही महिन्यांपासून एकापाठोपाठ एक दिग्गज कंपन्यांनी नोकरकपातीचे सत्र सुरू केले आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. यातच आता ४ मोठ्या आर्थिक सल्लागार कंपन्यांपैकी एक असलेल्या Deloitte कंपनीने तब्बल १२०० जणांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मंदीमुळे नोकरकपातीची घोषणा केल्याचे सांगितले जात आहे.
मंदीच्या सावटामुळे विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. गेल्या काही काळात जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता डेलॉइट कंपनी या यादीत सामील झाली आहे. डेलॉइट ही ४ मोठ्या आर्थिक सल्लागार कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. लंडन-मुख्यालय असलेली फर्म डेलॉइटने २०२२ मध्ये ५९.३ अब्ज डॉलर वार्षिक कमाई नोंदवली. डेलॉइट कंपनीने १२०० जणांना नोकरीवरून काढले असून, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण सुमारे १.४ टक्के आहे.
भारतावर परिणाम नाही
भारतात डेलॉइटचा कारभार विस्तारलेला असून, या नोकरकपातीचा परिणाम भारतात होणार नसल्याचे म्हटले जात आहे. डेलॉइटच्या वार्षिक पारदर्शकता अहवालानुसार, यूएसमधील कर्मचाऱ्यांची संख्या २०२१ मध्ये ६५ हजारांवरून गेल्या वर्षी ८० हजारांपर्यंत वाढली आहे. डेलॉइट अमेरिकेत कर्मचारी कपात करत असल्याचे म्हटले जात आहे. Deloitte व्यतिरिक्त KPMG ने फेब्रुवारीमध्ये घोषणा केली की, ते यूएसमधील त्यांच्या २ टक्के पेक्षा कमी कर्मचाऱ्यांची कपात करतील. याशिवाय अर्न्स्ट अँड यंगने अमेरिकेतील ३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. McKinsey & Co सुमारे २ हजार कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"