Join us

पतंजलीच्या आयपीओबाबत बाबा रामदेव यांनी केली मोठी घोषणा, गुंतवणुकदारांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 9:16 PM

Baba Ramdev News: पतंजलीने (Patanjali) एफएमसीजी सेक्टरमध्ये हिंदुस्थन युनिलिव्हर लिमिटेडसारख्या कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली आहे.

नवी दिल्ली - बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने सहकारी कंपनी असलेल्या रुची सोया या कंपनीचे एफपीओ बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर पतंजलीने (Patanjali) एफएमसीजी सेक्टरमध्ये हिंदुस्थन युनिलिव्हर लिमिटेडसारख्या कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीच्या योजनेबाबत बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी सांगितले की, आम्ही एचयूएल वगळता इतर सर्व कंपन्यांना पिछाडीवर टाकले आहे. आता एचयूएल हीच आमच्यापेक्षा मोठी कंपनी राहिली आहे. पतंजलीच्या वाढल्या कारभारावरून बाबा रामदेव म्हणाले की, आम्ही २०२५ पर्यंत एचयूएललासुद्धा मागे टाकण्याची योजना आखत आहोत. (Big announcement made by Baba Ramdev about Patanjali's IPO, curiosity among investors)

दरम्यान, बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार देणार असल्याचेही सांगितले. ते म्हणाले की, पतंजलीने गेल्या पाच वर्षांमध्ये पाच लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. आता आम्ही पुढच्या पाच वर्षांमध्ये पाच लाख नवे रोजगार देऊ. आम्ही २ लोकांपासून सुरुवात करून योग २०० देशांमध्ये पोहोचवण्यात यश मिळवले आहे. आम्ही १०० पेक्षा अधिक औषधे तयार केली आहेत. एवढेच नाही तर आम्ही रुची सोयाचा व्यवसाय वाढवून १६ हजार ३१८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आहे. आम्ही रुची सोयाला २४.४ टक्केच्या वेगाने पुढे घेऊन जात आहोत. पुढे कंपनीचा भर हा संशोधन, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर असेल. २०२०-२१ या वर्षात पतंजलीचा व्यवसाय हा सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा झाला आहे.

बाबा रामदेव पुढे म्हणाले की, पतंजलीच्या क्षमतेचा सातत्याने विस्तार सुरू आहे. आता आम्ही पोषण करणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहोत. महिलांशी संबंधित हेल्थकेअर प्रॉडक्टवरही आता लक्ष दिले जात आहे. आता आम्ही रुची सोयाला एफएमसीजी कंपनी बनवणार आहोत. आम्ही रुटी सोयासारख्या कंपनीला टर्नअराऊंड केले आहे. आता आम्ही ४ हजार ३०० कोटी रुपयांचे एफपीओ आणत आहोत. तसेच आम्ही तुम्हाला लवकरच पतंजलीच्या आयपीओबाबतही माहिती देणार आहोत. सध्या पतंजली समुहाचे लक्ष पुढच्या तीन चार वर्षांत आपल्या कंपन्यांना कर्जमुक्त करण्याचे आहे.  

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीव्यवसायभारत