TATA Group News :टाटा समूह पुढील पाच वर्षांत सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन (EV), बॅटरी आणि संबंधित उद्योगांमध्ये 5 लाख नोकऱ्या निर्माण करणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. एन चंद्रशेखरन यांनी भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या उद्दिष्टात उत्पादन क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
इंडियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट (IFQM) तर्फे येथे आयोजित एका चर्चासत्रात चंद्रशेखरन यांनी ही घोषणा केली. यावेळी एन चंद्रशेखरन म्हणाले की, "टाटा समूहाच्या उत्पादन, असेंबली, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि संबंधित उद्योगांमधील गुंतवणुकीमुळे मला विश्वास आहे की, आम्ही पुढील पाच वर्षांत 5 लाख नोकऱ्या निर्माण करू."
यावेळी त्यांनी या उपक्रमांमध्ये सरकारच्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या गरजेवर भर दिला. चंद्रशेखरन म्हणाले, "जर आपण उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्माण करू शकत नाही, तर आपण विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की, दर महिन्याला 10 लाख लोक येत आहेत, त्यामुळे आपल्याला तेवढ्याच नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे." त्यांनी सेमीकंडक्टरसारख्या नवीन उत्पादनाच्या महत्त्वावर भर दिलाआणि यामुळे आठ ते दहा अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतात, असेही सांगितले.
दरम्यान, FY23 मध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्रातील रोजगारामध्ये 7.4 टक्के वाढ झाली आहे. यामुळे 13 लाख नवीन नोकऱ्या आल्या, जे FY22 मध्ये 11 लाखांपेक्षा जास्त होते. आर्थिक वर्ष 23 मध्ये एकूण औद्योगिक उत्पादन 21.5 टक्क्यांनी वाढून 144.86 ट्रिलियन रुपये झाले. उत्पादन क्षेत्रातील GVA योगदानामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला, त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. या पाच राज्यांनी मिळून देशाच्या एकूण उत्पादन GVA मध्ये 54.5 टक्के योगदान दिले आहे.