मुंबई - फ्युचर ग्रुपच्या फ्युचरचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कंपनीने सुमारे दीड वर्षांपूर्वी आपले स्टोअर्स रिलायन्स रिटेलला विकण्याच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अॅमेझॉनने या प्रस्तावित डीलला विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सुरू झालेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे फ्युचर ग्रुपच्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलायन्स रिटेलने फ्युचर रिटेलच्या अनेक स्टोअर्सचे टेकओव्हर केल्याचे वृत्त आले होते. यादरम्यान, फ्युचर रिटेलने बुधवारी सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीडने टेकओव्हर केलेले आपले स्टोअर्स परत मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने सांगितले की, आता ते आपल्ये स्टोअर्स परत मिळवण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलतील.
कंपनीच्या या घोषणेनंतर फ्युचर ग्रुपच्या कंपनींचे शेअर कोसळण्यास सुरुवात झाली. फ्युचर रिटेलचा शेअर गुरुवारी ८.१७ टक्क्यांनी तुटून ३८.८० रुपयांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारांदरम्यान कंपनीचा शेअर एकवेळ ३८.३० टक्क्यांपर्यंत घसरला होता. हा कंपनीच्या शेअरमधील ५२ आठवड्यांतील निचांकी स्तर आहे.
फ्युचर लाईफस्टाईल फॅशनचा स्टॉकसुद्धा गुरुवारी १०.०९ टक्क्यांनी घसरून ४०.५५ रुपयांवर आला. दिवसाच्या व्यवहारत एकवेळ हा स्टॉक ३९.५० रुपयांपर्यंत खाली आला होता. हा या कंपनीतील शेअरचा ५२ आठवड्यांमधील निचांक आहे.
फ्युचर ग्रुपच्या फ्युचर सप्लाय चेन सॉल्युशन्स लिमिटेडचा स्टॉक्ससुद्धा ५.९६ टक्क्यांनी घसरून ५२.९० रुपयांच्या स्तरावर बंद झाला. कंपनीचा स्टॉक एकवेळ ५२.६५ रुपयांपर्यंत घसरला होता. हा कंपनीचा ५२ आठवड्यांमधील निचांक आहे.