Join us

Byju’s ला मोठा झटका, आकाश एज्युकेशनमधील ६ टक्के भागीदारी विकण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 2:33 PM

आकाश एज्युकेशन ही थिंक अँड लर्नची उपकंपनी आहे. एप्रिल २०२१ मध्ये, Byju's नं आकाश एज्युकेशनचं अधिग्रहण केलं होतं.

Byju’s crisis: एज्युटेक कंपनी बायजूच्या अडचणीत वाढ होत आहे. खरं तर, बायजू ब्रँडची मालकी असलेल्या 'थिंक अँड लर्न' या कंपनीला लवाद न्यायालयाने आकाश एज्युकेशनमधील सुमारे ६ टक्के हिस्सा विकू नये असं सांगितलं आहे. आकाश एज्युकेशन ही थिंक अँड लर्नची उपकंपनी आहे. एप्रिल २०२१ मध्ये, Byju's नं आकाश एज्युकेशनचं अधिग्रहण केलं होतं. 

काय आहे प्रकरण? 

आकाश एज्युकेशन, थिंक अँड लर्नची उपकंपनी आहे. अब्जाधीश डॉ. रंजन पै यांच्या नेतृत्वाखालील एमईएमजी फॅमिली ऑफिसकडून घेतलेले सुमारे ३५० कोटी रुपये जमा करण्यात अपयशी ठरली आहे. एमईएमजी फॅमिली ऑफिसकडून आपल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी मार्चमध्ये लवादाची कार्यवाही सुरू केली होती. एका कायदेशीर प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राच्या नियमांनुसार भारतात नियुक्त केलेल्या आपत्कालीन लवादानं ४ एप्रिल रोजी या संदर्भात निर्देश जारी केले. बायजू आणि एमईएमजीनं या संदर्भात ईमेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही. 

नुकताच ५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ 

काही काळापासून रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या BYJUS ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. यावेळी सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास (WFH) सांगितलं होतं. यानंतर आणखी एक मोठी कर्मचारी कपात होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. फक्त एक दिवस आधी, कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल केला होता. त्यात आपल्याला वेतन देण्यास पुन्हा विलंब होणार असल्याचं त्यात म्हटलं होतं.  

रिस्ट्रक्चरिंग अंतर्गत हा निर्णय 

कंपनी बिझनेस रिस्ट्रक्चरिंगच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी झी बिझनेसशी बोलताना दिली. ऑपरेटिंग स्ट्रक्चर सुलभ करून खर्च कमी करता येईल आणि रोख प्रवाहाचं उत्तम व्यवस्थापन करता येईल, यासाठी कंपनीनं बिझनेस रिस्ट्रक्चरिंगची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती.

टॅग्स :व्यवसाय