आयफोनची सर्वात मोठी उत्पादक कंपनी फॉक्सकॉन भारतात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट वाढवण्याचा विचार करत आहे. फॉक्सकॉनचा हा प्रकल्प भारतात तामिळनाडूमध्ये आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यानं रविवारी लिंक्डइन पोस्टमध्ये यासंद्भातील माहिती दिली. मात्र, यापेक्षा अधिक तपशील त्यांनी पोस्टमध्ये शेअर केलेला नाही. फॉक्सकॉन ही केवळ आयफोनची सर्वात मोठी उत्पादक नाही तर करारावर इलेक्ट्रॉनिक उपकरणांतं उत्पादन करत असलेली जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय तैवानमध्ये आहे.पुढील वर्षापर्यंत भारतातील गुंतवणूक आणि कर्मचारी संख्या दोन्ही दुप्पट करण्याची योजना असल्याचं कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितलं आहे. चीनपासून दूर जाण्याचं उद्दिष्ट लक्षात घेऊन कंपनी भारतात आपलं अस्तित्व आणखी मजबूत करण्याचा विचार करत असल्याचं म्हटल जातंय.कोणी दिली माहितीफॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी व्ही. ली यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. "(कंपनी) भारतात रोजगार, थेट विदेशी गुंतवणूक आणि व्यवसाय दुप्पट करण्याची तयारी करत आहे," असं त्यांनी यात म्हटलं. पुढील वर्षी या वेळेपर्यंत हे लक्ष्य गाठता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापेक्षा जास्त माहिती त्यांनी शेअर केलेली नाही.
तामिळनाडूत कामफॉक्सकॉनचा तामिळनाडूमध्ये आधीच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. या प्लांटमध्ये ४० हजार लोक काम करत आहेत. कंपनीनं कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट केल्यास ही संख्या ८० हजारांपर्यंत जाऊ शकते. कंपनीनं याच प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवेल असं नाही. दरम्यान, कर्नाटक सरकारनं फॉक्सकॉन राज्यात ६०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं ऑगस्ट महिन्यात सांगितलं होतं. ही गुंतवणूक २ प्रकल्पांमध्ये करण्याचे नियोजन आहे. कंपनी राज्यात आयफोनसाठी एक केस आणि चिप मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करू शकते.