ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचं (Flipkart) मूल्यांकन दोन वर्षांत पाच अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा अंदाजे ४१,००० कोटी रुपयांनी घसरलं आहे. अमेरिकेतील मूळ कंपनी वॉलमार्टच्या इक्विटी व्यवहारातून ही माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टमधील वॉलमार्टच्या इक्विटी संरचनेतील बदलांनुसार, ३१ जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ई-कॉमर्स कंपनीचं मूल्यांकन ४० अब्ज डॉलर्स असून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कमी होऊन ते ३५ अब्ज डॉलर्स इतकं झालं आहे.
काय आहे कारण?
फ्लिपकार्टच्या (Flipkart) मूल्यांकनातील घसरण फोन पे (PhonePe) या आर्थिक तंत्रज्ञान कंपनीला वेगळ्या कंपनीत विभाजित केल्यामुळे झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान, सूत्रांच्या म्हणण्यानुसार फ्लिपकार्टचं सध्याचं मूल्यांकन ३८-४० अब्ज डॉलर्सदरम्यान आहे. वॉलमार्टनं २०२१-२२ या आर्थिक वर्षात फ्लिपकार्टमधील ८ टक्के हिस्सा ३.२ अब्ज डॉलर्सला विकला होता. यानुसार, ई-कॉमर्स कंपनीचं मूल्यांकन ४० अब्ज डॉलर्स होते.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, अमेरिकन रिटेल दिग्गज कंपनीनं ३.५ अब्ज डॉलर्स देऊन कंपनीतील आपला हिस्सा १० टक्क्यांनी वाढवून ८५ टक्के केला. या आधारे, फ्लिपकार्टचं एंटरप्राइझ मूल्य ३५ अब्ज डॉलर्स होतं. तथापि, फ्लिपकार्टनं वॉलमार्टच्या अहवालानुसार मूल्यांकनातील कपात नाकारली आहे, कारण हे कंपनीच्या मूल्यांकनातील 'योग्य समायोजन'मुळे झालं आहे.
कंपनीनं काय म्हटलं?
"हे स्पष्टीकरण चुकीचं आहे. फोन पे २०२३ मध्ये वेगळं करण्यात आलं आहे. यामुळे फ्लिपकार्टच्या मूल्यांकनात योग्य समायोजन करण्यात आलं," अशी प्रतिक्रिया फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यानं दिली. उद्योगाचं मूल्यांकन २०२१ मध्ये करण्यात आलं. त्यावेळी ई कॉमर्स कंपनीच्या एकूण मूल्यात फिनटेक फर्म फोन पे चं मूल्यांकनही होतं. फोन पे चं मूल्यांकन गुंतवणूकदारांचा समूह जनरल अटलांटिक, टायगर ग्लोबल, रिबिट कॅपिटल आणि टीव्हिएस कॅपिटल फंड्सकडून ८५ कोटी डॉलर्स जमवल्यानंतर १२ अब्ज डॉलर्स झालं असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या सूत्रांनी दिली.