Join us  

Adani Group ला मोठा झटका! ४०० कोटींचा करार अडकला; २ वेळा हुकली तारीख, TATA ही रेसमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 3:33 PM

Gautam Adani Group: कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी अदानी समूहाकडून सामंजस्य करार केला होता. मात्र, अद्यापही तो पूर्ण होऊ शकलेला नाही. जाणून घ्या...

Gautam Adani Group: हिंडेनबर्ग संस्थेने अहवाल प्रसिद्ध केल्यापासून अदानी समूहाला प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. सुरुवातीला एफपीओ मागे घेण्यात आला. तसेच तीन बड्या करारातून माघार घ्यावी लागली. यातच आता अदानी समूहाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अदानी समूहाचा एक मोठा ४०० कोटींचा करार अडकला असून, यामध्ये टाटा समूह देखील अदानींना टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. या कराराची शेवटची तारीख दोन वेळा हुकल्याचे म्हटले जात आहे. 

उद्योगपती गौतम अदानी हळूहळू विमान वाहतूक क्षेत्रात आपले पाय रोवत आहेत. प्रथम ६ विमानतळांचे कामकाज ताब्यात घेण्यासाठी त्यांनी बोली जिंकली, नंतर मुंबई विमानतळ ताब्यात घेतले. आता देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. कंपनीने एमआरओ व्यवसायात प्रवेश करण्यासाठी एअर वर्क्सचे अधिग्रहण करण्याची योजना आखली होती, परंतु आता त्यास विलंब होत आहे. एअर वर्क्सच्या अधिग्रहणानंतर अदानी ग्रुपची टाटा ग्रुपसोबत या क्षेत्रात स्पर्धा होऊ शकते. याचे कारण म्हणजे टाटा समूह एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेड (एईएसएल) खरेदी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. ही एअर इंडियाची उपकंपनी होती, जी खाजगीकरणाच्या वेळी वेगळी झाली होती. आता सरकार ती विकण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. 

एअर वर्क्स खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार 

अदानी समूहाने एअर वर्क्स खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. या सामंजस्य कराराची अंतिम मुदत दोनदा निघून गेली आहे. त्याची शेवटची अंतिम मुदत आर्थिक वर्ष २०२२-२३ आर्थिक वर्षाची चौथी तिमाही म्हणजे जानेवारी-मार्च होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीजने एअर वर्क्सला ४०० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता. पण तो पूर्ण झाला नाही. यासाठी पुंज लॉयड ग्रुप कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. ज लॉयड ग्रुपची एअर वर्क्समध्ये २३ टक्के भागीदारी आहे. सद्या पुंज लॉयड ग्रुप लिक्विडेशन म्हणजेच कंपनी बंद होण्याच्या परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे एअर वर्क्सच्या मालमत्ताही बँकेच्या अखत्यारित असून त्यामुळे अदानी समूहाशी व्यवहार करण्यास वेळ लागत आहे.

अदानी समूहाचा एअर वर्क्सच्या माध्यमातून एमआरओ क्षेत्रात प्रवेश 

याबाबत अदानी ग्रुप, एअर वर्क्स आणि पुंज लॉयड ग्रुपकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. अदानी समूहाला एअर वर्क्सच्या माध्यमातून एमआरओ क्षेत्रात प्रवेश करायचा आहे. विमानतळाच्या कामकाजासोबतच ड्युटी फ्री, ग्राउंड हँडलिंगचे काम सुरू करून कंपनीला आपला महसूल वाढवायचा आहे, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, एअर वर्क्स ही देशातील सर्वांत जुनी खाजगी MRO कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९५१ मध्ये पी.एस. मेनन आणि बी.जी. मेनन नावाच्या दोन मित्रांनी केली होती. कंपनी देशातील २७ शहरांमध्ये सेवा देते. कंपनीचे मुंबई, होसर आणि कोची येथे हँगर्स आहेत. सरकारी मालकीची एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी एमआरओ कंपनी आहे. २०२१-२२ मध्ये त्यांनी ४५० विमाने हाताळली आणि तिचा नफा ८४० कोटी रुपये होता. ही कंपनी विकत घेण्यासाठी टाटा समूहाने जर्मनीच्या लुफ्थांसा आणि फ्रान्सच्या एअर फ्रान्स-केएलएम यांच्याशी करार करून समूहही स्थापन केला आहे. कंपनीचे ६ हँगर आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :अदानीगौतम अदानीटाटाएअर इंडिया