Anil Ambani Reliance Infrastructure : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर सोमवारी १० टक्क्यांनी वधारून १८५.६५ रुपयांवर बंद झाला. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरनं दिवसभरात १९२.१५ रुपयांचा उच्चांक गाठला. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स वेलोसिटी लिमिटेडनं रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड (आरईव्हीपीएल) ही नवी कंपनी स्थापन केली आहे. त्यांना कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन मिळालं असल्याची माहिती कंपनीनं दिली. रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड ऑटोमोबाईल आणि संबंधित अॅक्टिव्हिटीजसाठी डिझाइन केलेले आहे.
३००० कोटी जमवण्याचे प्रयत्न
अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड्सच्या (एफसीसीबी) माध्यमातून ३५० मिलियन डॉलर्स (३००० कोटी रुपये) उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनी या पैशाचा वापर आपलं कर्ज (रुपयाचे कर्ज) फेडण्यासाठी करेल आणि वीज निर्मितीसारखे नवीन व्यवसाय सुरू करेल. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं चार नवीन उपकंपन्या सुरू केल्या. यामध्ये रिलायन्स जय प्रायव्हेट लिमिटेड (आरजेपीएल), रिलायन्स अनलिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड (आरयूपीएल), रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स राइज प्रायव्हेट लिमिटेड (आरआरपीएल) यांचा समावेश आहे.
'या' व्यवसायांवर लक्ष देणार
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या उपकंपन्या इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कन्सल्टन्ससी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड फ्युअल ट्रान्सपोर्टसाठी व्हेईकलच्या उत्पादनासारख्या व्यवसायांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरव्यतिरिक्त रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्येही सोमवारी चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर सोमवारी ४ टक्क्यांहून अधिक वधारून २६.०७ रुपयांवर बंद झाला. रिलायन्स पॉवरचा शेअर ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३४.३५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १३.८० रुपये आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं ऑगस्ट २०२२ मध्ये एफसीसीबीच्या रुपात १२३ रुपये प्रति शेअर दरानं ४०० मिलियन डॉलर्स उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, नंतर कंपनीनं या योजनेवर पुढे पाऊल टाकलं नाही.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)