शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअरनं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अकासा एअरनं आपल्या विमानांच्या ताफ्यात २० व्या विमानाचा समावेश केलाय. यासह ही एअरलाइन आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्यास पात्र ठरली आहे. कंपनीनं मंगळवारी ही माहिती दिली. 7 ऑगस्ट रोजी विमान कंपनी आपल्या ऑपरेशन्सना एक वर्ष पूर्ण करेल.
कंपनीच्या ताफ्यात सामील झालेलं हे विमान बोईंग ७३७ मॅक्स आहे. ही MAX विमानाचं 737-8-200 एडिशन आहे. यासह अकासा एअर हे विमान आपल्या ताफ्यात सामील करून घेणारी आशियातील पहिली एअरलाइन बनली आहे. अकासा एअरमध्ये सामील झालेल्या बोईंग 737-8-200 चा रजिस्ट्रेशन VT YAV आहे. 28 जुलै 2023 रोजी अमेरिकेतील सिएटल येथे अकासा एअरलाईन्सकडे हे विमान सुपुर्द करण्यात आलं. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे विमान बंगळुरूला पोहोचलं. कामकाजाला सुरूवात झाल्यापासून एका वर्षाच्या आत कंपनीच्या ताफ्यात 20 विमानांचा समावेश करण्यात आलाय. यामुळे आता आकासा एअर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीही पात्र झाली आहे.
अत्याधुनिक विमानबोईंग 737-8-200 विमान पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रगत आहे. हे विमान आपल्या श्रेणीतील सर्वाधिक लेगरूमसाठी ओळखलं जातं. त्यामुळे एअरलाइन ग्राहकांचा अनुभव नेहमीपेक्षा चांगला बनवू शकते. यावर आकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. 20 वं विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा हा ऐतिहासिक क्षण आकासाच्या यशोगाथेतील आंतरराष्ट्रीय अध्यायाची सुरुवात आहे. ही विशेष संधी आपल्याला कंपनीच्या भविष्याबाबत अत्यंत आशावादी बनवत असल्याचे ते म्हणाले.