नवी दिल्ली:शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख असेलेले राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) यांच्या संपत्तीत मागील काही दिवसात प्रचंड वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे 'नाझरा टेक', 'टायटन कंपनी' आणि 'टाटा मोटर्स'सारख्या कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये म्हणजेच अवघ्या तीन दिवसात तब्बल 310 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
6 ऑक्टोबर 2021 रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 335.60 रुपये हो. ती फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये वाढून 417.80 रुपये झाली. म्हणजेच, टाटा मोटर्सचे शेअर्स अवघ्या तीन दिवसात 25% पर्यंत चढले. राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये 1.14% हिस्सा आहे. यानुसार, झुनझुनवाला यांनी फक्त तीन दिवसांमध्ये 310 कोटी रुपयांचा नफा मिळवला.
सोमवारी 7.39 टक्के वाढ
सोमवारी BSE वर 7.39 टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 411.25 रुपयांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, टाटाच्या डीव्हीआरचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह 201.10 रुपयांवर बंद झाले. जून 2021 च्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांचे या कंपनीमध्ये एकूण 3,77,50,000 शेअर्स आहेत. हे कंपनीच्या एकूण 1.14% टक्क्याच्या बरोबर आहेत. यापूर्वी मार्च 2021 च्या तिमाहीत, झुनझुनवालांकडे टाटा मोटर्सचे 4,27,50,000 शेअर्स होते. जुमच्या तिमाहीत त्यांनी आपले शेअर्स कमी केले.
जाणून घ्या तज्ज्ञांचे मत?
गेल्या काही दिवसात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये चांगली तेजी असली तरी बाजारातील तज्ञ त्याबाबत साशंक आहेत. टाटा मोटर्सच्या शेअर्सचे नवीन ब्रेकआउट 400 रुपयांवर आहे असा त्यांचा विश्वास आहे. जर स्टॉकने ही लेव्हल ओलांडली तर तो शेअर आणखी वर जाईल.