मुंबई: भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा, किंबहुना आर्थिक आधार देणाऱ्या योजना पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वीही EPFOनं नियमांत बदल केले होते. त्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार आहे. या व्यतिरिक्त तुमचं पीएफ खातंही सुरूच राहणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मोदी सरकारनं आणखी एक नवा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्याला आता ऑफलाइन पीएफही काढता येणार नसून ऑनलाइन पद्धतीनंच तो काढावा लागणार आहे. आपला आधार नंबर EPFOशी जोडलेला असल्यास भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमधील रक्कम ऑनलाइनही काढता येणार आहे.
भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ऑफलाइन क्लेमची गर्दी वाढल्यानं प्रादेशिक अधिकारी एन. के. सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.
EPFOनं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. आधी PF सदस्य फॉर्म भरून PF क्लेम करत होते. त्यानं ऑफिसवर प्रचंड ताण येत होता. पण आता अधिकाऱ्यांचा तो ताण हलका होणार आहे. ऑफलाइन पद्धतीनं क्लेम केल्यामुळे पीएफची रक्कम मिळण्यास उशीर व्हायचा. परंतु आता कंपन्यांना ऑनलाइनचाच पर्याय दिला गेला आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात फक्त ऑनलाइन पद्धतीनंच पीएफ काढता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
असा करा ऑनलाइन क्लेम
http://www.epfindia.com/site_en/ या वेबसाइटला भेट द्यावे. त्यावर ऑनलाइन क्लेमचा पर्याय पाहायला मिळेल. त्यानंतर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही लिंक ओपन करा. या लिंकवर आपल्याला यूएन नंबर आणि पासवर्ड द्यावा लागणार आहे. त्यानंतर ते लॉगिन होईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीनं त्या क्लेमला व्हेरिफाय करेल. त्यासाठी तुम्हाला युनिफाइड पोर्टलवर केवायसी पूर्ण करावी लागेल.