Join us

१ जुलैपासून होणार मोठा बदल; क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणाऱ्यांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:51 AM

प्रत्येक महिन्याप्रमाणे जुलै 2024 हा महिना देखील अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे आणि पहिल्याच तारखेपासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याबाबतचे नियमही बदलणार आहेत.

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकार मोठे बदल करत असते. आता १ जुलैपासून क्रेडिट कार्ड बाबतीत मोठे बदल होणार आहेत. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे बिल भरण्यात समस्या येऊ शकते. या प्लॅटफॉर्ममध्ये CRED, PhonePe, BillDesk सारख्या काही फिनटेकचा समावेश आहे. 

जून महिना संपत आला असून आठवडाभरानंतर जुलै महिना सुरू होईल. दरम्यान, दर महिन्याप्रमाणे पुढील महिन्यातही देशात काही मोठे बदल होणार आहेत आणि एक मोठा बदल क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंटशी संबंधित आहे. अहवालानुसार, RBI च्या नवीन नियमानुसार, १ जुलैपासून, सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजेच BBPS द्वारे केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येकाला भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे बिलिंग करावे लागेल.

कधीकाळी बर्गरच्या दुकानात काम केलं, जगभरात नाव कमावलं; आज करतायेत कोट्यवधीची कमाई

सेंट्रल बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही अनेक मोठ्या बँका आहेत ज्यांनी नवीन बदलांतर्गत त्यांचे नियम बदलले नाहीत आणि यामध्ये एचडीएफसी बँक-आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. अहवालानुसार, RBI च्या नवीन नियमानुसार, सुमारे ८ बँकांनी त्यांचे पाऊल पुढे टाकले आहे, यामध्ये SBI कार्ड, बँक ऑफ बडोदा कार्ड, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे.

हे नवीन नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आणले आहे. BBPS ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने वेगवेगळ्या पेमेंट सेवांसाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आता त्याच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत जवळ येत आहे आणि जर बँकांनी निर्धारित वेळेत त्याचे पालन केले नाही तर ते त्यांच्यासाठी तसेच क्रेडिट कार्ड पेमेंटवर अवलंबून असलेल्या फिनटेक प्लॅटफॉर्मसाठी अडचणीचे कारण बनू शकते.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक