Join us

RBIच्या नियमात मोठा बदल, उद्यापासून 24 तास मिळणार 'ही' बँकिंग सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 8:05 PM

लाखो रुपये पाठवण्याचे (ट्रान्सफर) चांगले माध्यम असलेल्या NEFTच्या नियमांत RBIनं मोठा बदल केला

नवी दिल्ली : लाखो रुपये पाठवण्याचे (ट्रान्सफर) चांगले माध्यम असलेल्या NEFTच्या नियमांत RBIनं मोठा बदल केला असून, उद्यापासून त्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. आरबीआयनं केलेल्या या बदलामुळे ग्राहकांना नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) सुविधा आता 24 तास मिळणार आहे. आता ग्राहकांना आठवड्यातील सात दिवसांमध्ये कधीही पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करता येणार आहेत. NEFT या सुविधेचा एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे पाठवण्यासाठी वापर केला जातो.

एनईएफटीमधून (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फण्डस् ट्रॉन्सफर) काही ठराविक काळात ऑनलाइन पद्धतीनं पैसे ट्रान्सफर केले जातात. NEFTद्वारे तुम्ही 2 लाखापर्यंत रोख रक्कम दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये पाठवू शकता. सद्यस्थितीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत NEFT द्वारे पैसे पाठवण्यात येत आहेत. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंतच NEFT चा वापर करता येतो. मात्र आता या सुविधेची अंमलबजावणी झाल्यामुळे ग्राहकांना दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस केव्हाही एका खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवणं सहजसोपं होणार आहे.

आरबीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बँकेतून पैसे पाठवण्यासाठी तुमच्या खात्यात ठरावीक रक्कम असणे गरजेचे आहे. त्यामुळे पैसे वळते करताना कोणत्याही अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही. याबाबत संबंधित बँकांनाही याची काळजी घेण्याची सूचना आरबीआयनं केली आहे.  आरबीआय NEFT आणि RTGS द्वारे पैसे पाठवताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. तर IMPS द्वारे आताही बँकेतून पैसे पाठवताना ठराविक रक्कम घेतली जाते. तसेच IMPS द्वारे फक्त काही ठराविक रक्कमच ट्रान्सफर करता येते. तर RTGS द्वारे आपण मोठी रक्कम ट्रान्सफर करु शकता. मात्र आता NEFT सुविधा ग्राहकांना 24 तास घेता येणार आहे. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकांसमोरील अडचणी दूर होणार आहे