नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने पीपीएफशी संबंधित नियमांमध्ये तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
दरम्यान, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने नुकतेच मुलाच्या नावाने तयार केलेले पीपीएफ खाते, एकापेक्षा अधिक पीपीएफ खाती आणि टपाल कार्यालयांद्वारे नॅशनल स्मॉल सेव्हिंग (NSS) स्कीम अंतर्गत एनआरआयच्या पीपीएफ खात्यांसंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबद्दल जाणून घ्या...
१) मुलाच्या नावाने उघडलेले पीपीएफ खाते
सरकारने म्हटले आहे की, मुलाचे वय १८ वर्ष होईपर्यंत त्याच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खाते दराने (POSA) व्याज दिले जाईल. त्यानंतर, पीपीएफसाठी लागू होणारा व्याजदर लागू होईल. मॅच्युरिटीचे कॅलक्युलेशन त्याच्या १८ व्या वाढदिवसापासून केले जाईल. दरम्यान, अनेक लोक आपल्या मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडतात.
२) एकापेक्षा जास्त पीपीएफ खात्यासाठी नियम
सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्याने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असेल, तर प्रायमरी खात्यावर सध्याच्या व्याजदरावर व्याज दिले जाईल. दुसरे म्हणजे सेकंडरी खाते पहिल्या खात्यात विलीन केले जाईल. परंतु, प्रायमरी खाते दरवर्षी लागू होणाऱ्या गुंतवणुकीच्या मर्यादेत असेल. विलीनीकरणानंतर, प्रायमरी खात्यावर सध्याच्या योजनेच्या दरानुसार व्याज मिळत राहील. दरम्यान, लक्षात असू द्या की प्रायमरी आणि सेकंडरी खाती वगळता, इतर सर्व खात्यांवर ते उघडल्याच्या दिवसापासून कोणतेही व्याज मिळणार नाहीत. त्यात जमा केलेली रक्कम शून्य टक्के व्याजाने परत केली जाईल.
३) एनआरआयसाठी पीपीएफ खात्याचे नियम
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम (पीपीएफ), १९६८ अंतर्गत उघडलेली फक्त सध्याची एनआरआय पीपीएफ खाती, जिथे खातेदाराची निवासी स्थिती विशेषत: फॉर्म एच मध्ये विचारली जात नाही, खातेधारकाला (भारतीय नागरिक जो खात्याच्या कालावधीत एनआरआय आहे) ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत POSA व्याजदर दिला जाईल. यानंतर, वर नमूद केलेल्या खात्यावर शून्य टक्के व्याज मिळेल.