Akasa Air Crisis : शेअर मार्केटमध्ये 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी सुरू केलेल्या आकासा एअरलाइन्सवर मोठे संकट आले आहे. अचानक कंपनीतील 43 वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. स्वतः आकासा एअरने ही माहिती दिल्ली उच्च न्यायालयाला दिली आहे. या वैमानिकांच्या राजीनाम्यामुळे कंपनी अडचणीत आली असून बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
नोटीस पीरियड पूर्ण केला नाहीआकासा एअरलाइन्सची बाजू मांडताना वकिलाने असा युक्तिवाद केला की, अचानक कंपनीचा राजीनामा दिलेल्या वैमानिकांपैकी एकाही अधिकारी किंवा कॅप्टनने नोटीस पीरियड पूर्ण केला नाही. या पदांसाठी नोटिस कालावधी अनुक्रमे 6 महिने आणि एक वर्षे होता. वैमानिकांच्या अचानक जाण्यामुळे, कंपनीला सप्टेंबरमध्ये दररोज सुमारे 24 उड्डाणे रद्द करावी लागली आणि यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे.
आकासा दररोज 120 उड्डाणे चालवतेकंपनीकडून सांगण्यात आले की, त्यांनी ऑगस्टमध्ये जवळपास 600 उड्डाणे रद्द केली आहेत आणि वैमानिकांनी या पद्धतीने एअरलाइन्स सोडल्या तर सप्टेंबरमध्येही 600 ते 700 उड्डाणे रद्द करावी लागतील. विशेष म्हणजे, अकासा एअर दररोज विविध हवाई मार्गांवर सुमारे 120 उड्डाणे चालवते. वकिलातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, कोणत्याही वैमानिकाने अचानक कंपनी सोडल्यास त्याच्या जागी दुसरी नियुक्ती करणे कठीण आहे.
शेवटच्या क्षणी उड्डाणे रद्द करावी लागलीआकासा एअरवर सध्या सुरू असलेल्या संकटादरम्यान, एअरलाइनचे सीईओ विनय दुबे यांनी बुधवारी सांगितले की, वैमानिकांच्या एका ग्रुपने अचानक नोकरी सोडून दिली, त्यांनी नोटीस पीरियडही पूर्ण केला नाही. यामुळे कंपनीवर मोठे संकट आले, शेवटच्या क्षणी उड्डाणे रद्द करावी लागली. दरम्यान, आकासा एअरचे वैमानिक प्रतिस्पर्धी एअरलाइन्समध्ये रुजू झाल्याची माहिती आहे.