नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी (PF) च्या 28 कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्याची माहिती लीक झाली आहे. रिपोर्टनुसार, पीएफ वेबसाइटचे हे हॅकिंग या महिन्याच्या सुरुवातीला झाले आहे. युक्रेनचे सायबर सिक्योरिटी रिसर्चर बॉब डायचेन्को (Bob Diachenko) यांनी ही माहिती दिली आहे. बॉब डायचेन्को यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी लिंक्डइन पोस्टद्वारे या हॅकिंगची माहिती दिली आहे.
रिपोर्टनुसार, या डेटा लीकमध्ये UAN क्रमांक, नाव, वैवाहिक स्थिती, आधार कार्डची संपूर्ण डिटेल्स, बँक खात्याची माहिती यांचा समोवश आहे. बॉब डायचेन्को यांच्या मते, हा डेटा दोन वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसवरून लीक झाला आहे. हे दोन्ही आयपी मायक्रोसॉफ्टच्या Microsoft's Azure cloud शी जोडलेले होते.
पहिल्या आयपी अॅड्रेसवरून 280,472,941 डेटा लीक झाल्याची आणि दुसऱ्या आयपी अॅड्रेसवरून 8,390,524 डेटा लीक झाल्याचे समोर आले आहे. तसेच, हा डेटा ज्या हॅकरपर्यंत पोहोचला आहे, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याशिवाय, डीएनएस सर्व्हरबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
डेटाचा चुकीच्या पद्धतीने हॅकर्स वापरू शकतात
आतापर्यंत 28 कोटी युजर्सचा डेटा कधीपासून ऑनलाइन उपलब्ध आहे, याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हॅकर्स या डेटाचा चुकीच्या पद्धतीने वापरही करू शकतात. हॅक झालेल्या माहितीच्या आधारे लोकांचे फेक प्रोफाईलही तयार केले जाऊ शकतात. बॉब डायचेन्को यांनीही या डेटा लीकची माहिती इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ला दिली आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतर, CERT-IN ने रिसर्चरला ई-मेलद्वारे अपडेट केले आहे. CERT-IN ने म्हटले आहे की, दोन्ही आयपी अॅड्रेस 12 तासांच्या आत बंद करण्यात आहेत. याशिवाय, अद्याप कोणत्याही एजन्सीने किंवा हॅकरने या हॅकिंगची जबाबदारी घेतलेली नाही.