भारती एअरटेल आणि अदानी समूहाची कंपनी अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) यांच्यात एक मोठा करार झाला आहे. या करारानुसार, भारती एअरटेलची बिझनेस-टू-बिझनेस (B2B) शाखा एअरटेल बिझनेस आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील अदानी एनर्जी सोल्युशन्ससाठी २ कोटी स्मार्ट मीटरला कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे. दरम्यान, भारती एअरटेलचा शेअर मंगळवारी १.५० टक्क्यांच्या वाढीसह १०६४.९० रुपयांवर बंद झाला.
काय म्हटलं कंपनीनं?
एअरटेल आपल्या मजबूत कम्युनिकेशन्स नेटवर्कद्वारे अदानी एनर्जी सोल्युशन लिमटेडच्या सर्व डिप्लॉयमेंट्ससाठी विश्वसनीय आणि सुरक्षित कनेक्टिव्हीटी उपलब्ध करुन देईल, असं एअरटेल बिझनेसनं निवेदनाद्वारे सांगितलं. एअरटेलचं स्मार्ट मीटरिंग सोल्युशन्स NB-IoT, 4G आणि 2G पॉवर्ड आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सना ते रिअल टाईम कनेक्टिव्हीटी सुरक्षित करण्यास मदत करेल. सोबतच ते स्मार्ट मीटर्स आणि हेडइंट अॅप्लिकेशन्सदरम्यान महत्त्वाचा डेटा ट्रान्समिशनही सुनिश्चित करेल असंही कंपनीनं म्हटलं.
डीलनंतर शेअरमध्ये तेजी
अदानी समूहासोबतच्या या कराराच्या वृत्ताचा परिणाम टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. मंगळवारी एअरटेलच्या शेअर्समध्ये सुमारे २ टक्क्यांनी वाढ झाली. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या सुरुवातीस, भारती एअरटेलचे शेअर्स १०५७ रुपयांच्या पातळीवर उघडले आणि ट्रेडिंग दरम्यान ते १०६७.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले.
भारतीय एअरटेलच्या शेअर्ससोबतच अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअरही मंगळवारी वाढीसह बंद झाला. या शेअरनं कामकाजादरम्यान ११९९ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली, परंतु कामकाजाच्या अखेरीस तो १.८७ टक्क्यांच्या वाढीसह ११६४.९० रुपयांवर बंद झाला. अदानी समूहाच्या या कंपनीचे बाजार भांडवल १.३० लाख कोटी रुपये आहे.