Join us  

Zomato Buys Paytm Ticketing Business : ₹२०४८००००००० ची मोठी डील! Zomato खरेदी करणार Paytm चा 'हा' व्यवसाय, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 8:25 AM

Zomato Buys Paytm Film Ticketing Business : झोमॅटो २०४८ कोटी रुपयांचा पेटीएमचा हा व्यवसाय खरेदी करणार आहे. कंपन्यांच्या संचालक मंडळानं दिली मंजुरी.

Zomato Buys Paytm Film Ticketing Business : पेटीएम ब्रँड चालवणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) बुधवारी आपला चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोला २,०४८ कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केली. चित्रपटांव्यतिरिक्त मनोरंजन तिकीट व्यवसायात क्रीडा स्पर्धा आणि संगीताच्या कार्यक्रमाच्या तिकिटांचाही समावेश आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळानं हा करार रोखीनं पूर्ण करण्यास मान्यता दिली आहे.

या करारानुसार, ओसीएलचा मनोरंजन तिकीट व्यवसाय ऑर्बजेन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (ओटीपीएल) आणि वेस्टलँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (डब्ल्यूईपीएल) या त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांकडे हस्तांतरित केला जाईल. त्यानंतर या उपकंपन्यांमधील १०० टक्के हिस्सा झोमॅटोला विकण्यात येणार आहे.

डिस्ट्रिक्ट नावाचं अॅप बनणारहा करार पूर्ण झाल्यानंतर झोमॅटो आपल्या मनोरंजन तिकीट व्यवसायासाठी 'डिस्ट्रिक्ट' नावाच्या नव्या अॅपद्वारे याचं काम ऑपरेट करणार आहे. ओसीएलनं एका निवेदनात म्हटलंय की, झोमॅटोला हा व्यवसाय विकला असला तरी पुढील १२ महिन्यांच्या कालावधीसाठी पेटीएमच्या अॅपवर तिकिटं बुक केली जाऊ शकतील. हा करार २०४८ कोटी रुपयांचा आहे, असं ओसीएलनं झोमॅटोसोबत केलेल्या कराराची माहिती देताना म्हटलं.

या करारानुसार झोमॅटो चित्रपट तिकीट व्यवसायात गुंतलेल्या ओटीपीएलला १,२६४.६ कोटी रुपयांना आणि इव्हेंटशी संबंधित वेस्टलँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ७८३.८ कोटी रुपयांना विकत घेणार आहे. ओसीएलनं दिलेल्या माहितीनुसाप या करारामध्ये मनोरंजन तिकीट व्यवसायातील सुमारे २८० विद्यमान कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल.

Zomato ची व्याप्ती वाढणार

या करारानंतर झोमॅटोच्या व्यवसायाची व्याप्ती वाढणार आहे. झोमॅटो अजूनही फूड प्रॉडक्ट्सच्या डिलिव्हरीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. पण आता शोची तिकिटं बुक करण्याचाही व्यवसाय त्याच्याकडे असणार आहे. "या निर्णयामुळे आम्हाला आमच्या मुख्य क्षेत्रात दीर्घकालीन वाढीवर आणि सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणं शक्य होईल," असं पेटीएमच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

दुसरीकडे, "प्रस्तावित अधिग्रहणानंतर आम्ही आमच्या ग्राहकांना चित्रपट आणि स्पोर्ट्स तिकीटसारख्या नवीन सुविधा देऊ शकू," असं झोमॅटोचे एमडी आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

टॅग्स :झोमॅटोपे-टीएम