पोर्ट-टू-पॉवर क्षेत्रात काम करणारा अदानी समूह 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह क्लिन एनर्जी क्षेत्रात सौर मॉड्यूल, पवन टर्बाइन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर तयार करण्यासाठी तीन गिगा कारखाने स्थापन करेल. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी बुधवारी ही माहिती दिली. अदानी समूह ग्रीन एनर्जी व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. 2030 पर्यंत जगातील अव्वल रिन्युएबल एनर्जी उत्पादक बनण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे.
गौतम अदानी यांना बुधवारी यूएसआयबीसी ग्लोबल लीडरशिप अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. “अदानी समूह आधीच 70 अब्ज डॉलर्स (हवामान बदल आणि हरित ऊर्जेसाठी) गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे. यामुळे आम्हाला भारतात तीन गिगा कारखाने उभारता येतील, जे जगातील सर्वात एकात्मिक हरित-ऊर्जा मूल्य चेनपैकी एक आहे. हे गिगा कारखाने पॉलिसिलिकॉनपासून ते सोलर मॉड्यूल्सपर्यंत असतील,” असे ते म्हणाले.
यामुळे अदानी समूहाला 45 GW ची अतिरिक्त रिन्युएबल एनर्जी क्षमता मिळेल. समूहाची सध्या 20 GW इतकी क्षमता आहे. यासह समूह 2030 पर्यंत 3 दशलक्ष टन हायड्रोजन क्षमता देखील जोडू शकेल, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी, अदानी समूहाचे प्रतिस्पर्धी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी कमी-कार्बन ऊर्जेतील गुंतवणुकीचा भाग म्हणून पाचवा गिगा कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती.