कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम खूप प्रचलित झाले आहे. आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यामुळे ऑफिसला जाण्याच्या तयारीचा, यायचा-जायचा वेळ वाचत आहे. या फावल्या वेळात हे कर्मचारी दुसरीकडे कुठे काम करता येते का हे पाहत आहेत. आयटी क्षेत्रात या दुसऱ्या नोकरीची चर्चा रंगली आहे. मूनलाइटिंग प्रकरणावरुन अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. आता मूनलाइटिंग संदर्भात इन्फोसिसने मोठा निर्णय घेतला आहे.
इन्फोसिसने आपल्या कर्मचार्यांना कंपनीत काम करताना इतर कंपन्यात नोकरी करण्याची मुभा दिली आहे. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र ही सूट देताना इन्फोसिसने दोन अटीही घातल्या आहेत. यात कर्मचारी फक्त गिग जॉब करू शकतात. ही पहिली अट असणार आहे. दुसरी अट म्हणजे कर्मचारी जे काही काम करतील, ते कोणत्याही प्रकारे इन्फोसिस किंवा त्याच्या ग्राहकांशी संबंधित नसावेत. दोघांमध्ये हितसंबंध नसावेत, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
वर्क फ्रॉम होम अन् मूनलाईटनिंग! ही तर कंपन्यांसोबत दगाबाजीच; विप्रोचे चेअरमन भडकले
इन्फोसिसने आपल्या कर्मचार्यांना गिग जॉब्सबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच लोकांना गिग जॉब्स कसे मिळू शकतात हे देखील सांगण्यात आले आहे.
गिग जॉब
कमी कालावधीची असलेल्या नोकरीला गिग जॉब्स म्हणतात. राइड शेअरिंग सेवा, एखाद्याच्या घराचे इंटिरियर डिझायनिंग, कोचिंग, फिटनेस ट्रेनिंग, अशा कालावधीच्या कामांना गिग जॉब म्हणतात. अशी कामे काही तासांसाठी असतात.
इन्फोसिसला काय फायदा?
या निर्णयामुळे इन्फोसिसला फायदा होणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. गिग जॉब्स कर्मचार्यांना कमाईचे इतर साधने देणार आहे. यासोबत कर्मचारी इन्फोसिसमध्ये काम करून आपली तांत्रिक कामाची आवडही पूर्ण करू शकणार आहेत. यामुळे इन्फोसिसला अनेक आव्हानांचा सामना करण्यास मदत होणार आहे.
कंपनीने अजुनही गिग जॉब्स मूनलाइटिंगच्या श्रेणीत असणार का हे स्पष्ट केलेले नाही. मूनलाइटिंग प्रकरण जगभर तापले असताना कंपनीने हे पाऊल उचलले आहे. सध्या या प्रकरणावरुन अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. इन्फोसिसनेही ही कारवाई केली होती. मूनलाइटिंगमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.