Gautam Adani Brother Mansukh Adani News: गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक आहेत. ते अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. रविवारपर्यंत त्यांची रिअल टाइम नेटवर्थ ६०.३ अब्ज डॉलर होती. आपल्या कंपन्यांच्या यशाचे श्रेय गौतम अदानी यांना जाते. परंतु, अदानी समूहाच्या उभारणीत त्यांच्या तीन भावांचाही मोलाचा वाटा आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. विनोद अदानी, वसंत अदानी आणि महासुख अदानी अशी त्यांची नावं आहेत. यापैकी महासुख अदानी बहुतेक वेळा लाइमलाइटपासून दूर राहिले आहेत. परंतु, कौटुंबिक साम्राज्यातील त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे.
महासुख अदानी यांचा जन्म गुजरातमधील मुंद्रा या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव शांतीलाल आणि आईचं नाव शांताबेन अदानी होतं. कुटुंबाची सुरुवात साधी होती. त्यांचे वडील कापडाचा छोटासा व्यवसाय करत होते. व्यवसायाशी निगडित कुटुंबात वाढलेल्या महासुख यांना लहानपणापासूनच उद्योजकतेची आवड होती. ते अगदी त्यांचे धाकटे बंधू गौतम अदान यांच्यासारखेच होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी अदानी समूहाच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, त्यांनी प्रकाशझोतात न राहणंच पसंत केलंय.
अनेक महत्त्वाचे निर्णय
गौतम अदानी हे समूहाचा सार्वजनिक चेहरा आहे, तर महासुख अदानी पडद्यामागील महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्यात सक्रीय आहेत. समूहातील धोरणात्मक व्यक्ती म्हणून त्यांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्ससह विविध क्षेत्रात योगदान दिलंय. आपला मोठा प्रभाव असूनही त्यांनी प्रसारमाध्यमांपासून अंतर राखलं आहे. व्यावसायिक वर्तुळात त्यांची अतिशय शांत उपस्थिती आहे.
महासुख अदानी आणि गौतम अदानी यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या घट्ट नातं आहे. त्यांचे वडील शांतीलाल अदानी यांनी आपल्या मुलांमध्ये मेहनतीची सवय लावली. यामुळे कौटुंबिक व्यवसायाला आकार मिळण्यास मदत झाली आहे. अदानी समूहाच्या जागतिक विस्तारात गौतम यांनी अधिक सार्वजनिक भूमिका बजावली. त्याचवेळी महासुख यांनी ऑपरेशनल बाबींवर लक्ष केंद्रित केलं. समूहाचे उद्योग सुरळीत चालतील, याची काळजी त्यांनी घेतली.