Join us

ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 5:42 PM

Fake Trading Apps: ट्रेडिंग ॲपच्या (trading app) नावाखाली अँड्रॉईड आणि iOS मोबाईलच्या माध्यमातून मोठा फ्रॉड सुरू आहे. सायबर सिक्युरिटी फर्म आयबीने यासंदर्भात एका रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे. 

Trading scams: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली भारतात असंख्य ऑनलाईन ॲप आहेत. पण, काही बोगस ॲप तयार करून त्यातून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अँड्राईड प्ले स्टोअर आणि iOS ॲपल स्टोअरमध्ये हे ॲप असून, त्यामाध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. सायबर सिक्युरिटी फर्म आयबीने एका रिपोर्टमध्ये याबद्दल खुलासा केला आहे. हॅकर्संकडून बनावट ट्रेडिंग ॲपचा वापर केला जात आहे आणि पिग बुचरिंग फ्रॉड सुरू आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

पिग बुचरिंग स्कॅमच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली गेली असल्याचा दावाही आयबीने रिपोर्टमधून केला आहे.

पिग बुचरिंग स्कॅम काय?

आयबीने आपल्या रिपोर्टमधून लोकांना आवाहन केले आहे की, मोबाईलमध्ये हे ॲप असतील, तर ते त्वरित अनइन्स्टॉल करावेत. या ॲपच्या माध्यमातून हॅकर्स लोकांना बोगस योजनांमध्ये गुंतवणूक करायला सांगतात. त्याला पिग बुचरिंग म्हटले जाते. 

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत हॅकर्स पोहोचतात आणि त्यांनी गुंतवणूक करावी यासाठी विश्वास निर्माण करतात. जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फंडमध्ये पैसे गुंतवायला सांगतात. गुंतवलेले पैसे काढायला गेल्यानंतर किंवा नफा किती झाला आहे, हे बघायला गेल्यानंतर ते ॲप गायब होऊन जाते. 

फेक ट्रेडिंग ॲप्स कोणते आहेत?

आयबीने म्हटले आहे की, हे ॲप युनिशॅडोट्रेड ॲप युनिॲप फ्रेमवर्कचा वापर करून बनलेले आहेत. हे ॲप पहिल्यांदा मे महिन्यात आले होते. या ॲप्सचे नाव iOS ॲपल स्टोअरवर SBI-INT आहे, तर अँड्रॉईड प्ले स्टोअरवर Finans Insights आणि Finans Trader 6 असे आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरून आता हटवले गेले आहे, पण ते हटवण्यापूर्वी 5000 लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. त्यामुळे तुम्हीही हे ॲप्स डाऊनलोड केले असेल, तर त्वरीत डिलिट करा. 

टॅग्स :शेअर बाजारसायबर क्राइमशेअर बाजारधोकेबाजीगुंतवणूक