Join us

वाहन उद्योग सुसाट, दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ; सर्वांचे लक्ष ई-स्कूटरकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 10:48 AM

Big increase in bike sales: जुलै महिन्यात मोटारसायकली व स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून ग्राहकांना विद्युत स्कूटर म्हणजेच ई-स्कूटरबाबतही प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. 

नवी दिल्ली : जुलै महिन्यात मोटारसायकली व स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून ग्राहकांना विद्युत स्कूटर म्हणजेच ई-स्कूटरबाबतही प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाच्या (एचएमएसआय) विक्रीत जुलैमध्ये तब्बल २० टक्के वाढ झाली आहे. कंपनीची ३,८५,५३३ वाहने जुलैमध्ये विकली गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा ३,२१,५८३ होता. यातील ३,४०,१३३ वाहने भारतात विकली गेली. आदल्या वर्षी हा आकडा ३,०९,३३२ इतका होता. याचाच अर्थ कंपनीची देशांतर्गत विक्री १० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने ४५,४०० वाहने निर्यात केली आहेत. आदल्या वर्षी हा आकडा १२,२५१ होता.एचएमएसआयचे विक्री व बाजार व्यवस्थापन संचालक यादविंदरसिंग गुलेरिया यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही हळूहळू उत्पादन वाढवीत आहोत. तसेच बाजारातील स्थितीवरही आमचे बारकाईने लक्ष आहे. आमच्या बहुतांश वितरकांनी आपले कामकाज पुन्हा सुरू केले आहे. लोकांकडून स्कूटर आणि मोटारसायकलींची विचारणाही वाढत चालली आहे. आता सणासुदीचा हंगाम जवळ आल्यामुळे विक्रीतील सुधारणा आणखी गतिमान होण्याची अपेक्षा आहे. 

१५ ऑगस्टला येेणार ओलाची ई-स्कूटर ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स कंपनीची ई-स्कूटर येत्या १५ ऑगस्ट रोजी बाजारात येत आहे.  या स्कूटरची वैशिष्ट्ये लवकरच जाहीर केली जाणार आहेत, असे कंपनीचे संस्थापक भाविश अगरवाल यांनी सांगितले. या स्कूटरची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. १५ जुलै रोजी कंपनीने बुकिंग सुरू केले होते.  पहिल्या २४ तासांत १ लाख स्कूटरचे बुकिंग झाले. नोंदणीसाठी वेबसाइटवर अतिगर्दी झाल्यामुळे अनेकांना ओटीपीच्या समस्येचा सामना करावा लागला. अगरवाल यांनी सांगितले की, एवढा प्रतिसाद आम्ही अपेक्षिलाच नव्हता. त्यामुळे वेबसाइटची क्षमता आम्ही फार वाढवलेली नव्हती. आता सर्व व्यवस्थित करण्यात आले आहे.

टॅग्स :व्यवसाय