Join us

तेलंगणात अदानी समूहाची मोठी गुंतवणूक, काँग्रेस सरकारसोबत दावोसमध्ये करार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:49 PM

अदानी समुहाकडून तेलंगणाता डेटा सेंटर आणि एअरोस्पेस पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने अदानी ग्रुपवर टीका करताना गौतम अदानी यांच्यावर आरोप केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारकडून जाणीवपूर्वक अदानी ग्रुपला नफा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता, नुकतेच काही महिन्यांपूर्वी तेलंगणाता सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस सरकारनेही अदानी ग्रुपसोबत उद्योगसंबंधित महत्त्वाचे करार केले आहेत. तेलंगणात गुंतवणुकीसाठी अदानी ग्रुपने पुढाकार घेत दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महत्त्वाचे करारही करण्यात आले आहेत.

अदानी समुहाकडून तेलंगणाता डेटा सेंटर आणि एअरोस्पेस पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी अदानी ग्रुपच्या प्रमुखांशी चर्चा केली. गौतम अदानी यांचे सुपुत्र आणि अदानी ग्रुपचे सीईओ करण अदानी आणि अदानी एअरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंश यांची भेट घेतली. 

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी अदानी समुहाच्या वरिष्ठांशी आणि प्रातनिधिक मंडळाशी चर्चा केली. तसेच, राज्याचा औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मित्तीसाठी सरकार उद्योगांना प्रोत्साहन देत आवश्यक त्या सुविधा आणि सबसिडी देईल, असेही रेड्डी यांनी म्हटले

अदानी ग्रुपच्यावतीने दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तेलंगणा सरकारसोबत ४ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरीही करण्यात आली. त्यानुसार, अदानी समुहाशी निगडीत कंपन्यांसोबत १२,४०० कोटींचे करार झाले आहेत. तेलंगणात अदानी समुहाकडून १०० एमडब्लू डेटा सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. तसेच, अदानी ग्रीनच्यावतीने दोन पंप स्टोरेज उभारण्यात येत असून त्यासाठीही ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर, अदानी डिफेन्स व एअरोस्पेसमध्ये  काऊंटर ड्रोन व मिसाईलच्या प्रकल्पासाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. यासंदर्भात, दावोस येथील फोरममध्ये गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत.

टॅग्स :गौतम अदानीकाँग्रेसतेलंगणाव्यवसाय