नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीच्या काळात खर्च कमी करण्यासाठी बहुतांश क्लायंटांनी डिजिटायजेशनकडे वळून आऊटसोर्सिग वाढविल्यामुळे भारतातील आयटी कंपन्या स्थानिक पातळीवर १ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ४० हजार नवे एक्झिक्युटिव्ह भरणार आहे. गेल्या वर्षीही कंपनीने जवळपास एवढीच भरती केली होती. टीसीएसचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, जूनच्या तिमाहीत कंपनीचा महसूल घटला असला तरी नवी भरती सुरूच राहणार आहे. बंगळुरूस्थित इन्फोसिस २० हजार कर्मचारी भरणार आहे. एचसीएलकडूनही १५ हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
नव्या संधी झाल्या उपलब्धजूनच्या तिमाहीत आयटी कंपन्यांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक राहिल्यामुळे आयटी कंपन्यांच्या भरतीला ब्रेक लागेल, असे जाणकारांचे मत होते. तथापि, कोविड-१९ मुळे कंपन्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे वळत असतानाच कामाचे आऊटसोर्सिंगही वाढवत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या कामांचा निपटारा करण्यासाठी सर्वच कंपन्यांना नवी भरती करावी लागणार आहे.