Amazon Layoff: एकीकडे कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर होत असताना, दुसरीकडे जगात मंदीचे सावट असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेकविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र, जगभरात ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एका बड्या कंपनीकडून तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी या कंपनीने १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली होती.
ट्विटर, मेटा आणि अन्य कंपन्यांसह आता ॲमेझॉन कंपनीने मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात येत आहे. जागतिक मंदीमुळे जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. यात आता ॲमेझॉन कंपनीची भर पडली आहे. सन २०२३ च्या पहिल्या महिन्यातच मोठी नोकरकपात करणार आहे. कंपनीने १८ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली असून, १८ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस ॲमेझॉनचे १.५ दशलक्षाहून अधिक कर्मचारी होते
गतवर्षीच्या सप्टेंबरच्या अखेरीस ॲमेझॉनचे १.५ दशलक्षाहून अधिक कर्मचारी होते, ज्यामुळे ते सर्वात मोठ्या यूएस नियोक्त्यांपैकी एक बनले आहे. ॲमेझॉनच्या या निर्णयानंतर, त्याच्या शेअरमध्ये २ टक्के वाढ झाली. या निर्णयामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होईल, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अँडी जेसीच्या वतीने एक नोट जारी करून सांगण्यात आले आहे की कंपनी १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. त्याच वेळी, यापूर्वी कंपनीने १० हजार कर्मचार्यांच्या बाहेर पडण्याबद्दल सांगितले होते.
दरम्यान, आम्ही या नोकरकपातीचा परिणाम झालेल्यांना सेपरेशन पेमेंट, हेल्थ इन्शुरन्स बेनिफिट्स आणि एक्सटर्नल जॉब प्लेसमेंट सपोर्ट देत आहोत. या सर्वांच्या योगदानाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आणि जे लोक आमच्यासोबत पुढचा प्रवास चालू ठेवतील, ते ग्राहकांना अधिकाधिक सोयी आणि सुलभ सुविधा देण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"