नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेनं ऑनलाइन आणि एटीएमच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. डेबिट कार्डसह इतर व्यवहार करत असताना ट्रान्झॅक्शनमध्ये येत असलेल्या अपयशावर बँकांना काही दिवसांतच निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. तशा प्रकारचे आदेशच आरबीआयनं दिले आहेत. म्हणजेच समजा आपण ऑनलाइन व्यवहार करत असताना खात्यातून पैसे कापले जातात, परंतु ते ग्राहकाला लागलीच परत मिळत नाहीत.एटीएममध्ये डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर बऱ्याचदा अशा घटना घडतात. त्यामुळे ग्राहकांचं टेन्शन भरपूर वाढतं. त्यामुळे आरबीआयनं बँकांना निर्देश देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं सुचवलं आहे. यावर तोडगा निघाल्यास ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एटीएममधून पैसे काढत असताना व्यवहार अयशस्वी झाल्यास पैसे कापले जातात, तसेच ते परत लगेचच ग्राहकाला मिळत नाहीत. मग तो व्यवहार निष्क्रिय समजला जातो. आरबीआयनं ई-कॉमर्स पेमेंट आणि कार्यवाही पूर्ण (टर्न अराउंड टाइम, TOT) करण्यासाठी नियमावली दिली आहे. बँकांना 'फेल्ड डेबिट कार्ड ट्राझॅक्शन्स'च्या प्रकरणांचा पाच दिवसांच्या आत निपटारा करावा लागणार आहे. तशा प्रकारचे आदेश केंद्रीय बँकेनंच दिले आहेत. त्यामुळे एटीएम, स्वाइप मशीन आणि आधार अनेबल्ड पेमेंट्स (AEPS) व्यवहाराचा मुद्दा पाच दिवसांच्या आत किंवा आयएमपीएसशी संबंधित अयशस्वी व्यवहाराचा मुद्दा एका दिवसाच्या आत बँकांना सोडवायचा आहे. RBIनं बदलला व्यवहाराशी संबंधित नियमः RBIने 20 सप्टेंबरला यासंबंधी परिपत्रक काढलं होतं. ज्यात कार्यवाही पूर्ण (टर्न अराउंड टाइम, TOT)चे निर्देश स्पष्ट करण्यात आले आहेत. केंद्रीय बँकेनं सर्वच पेमेंट ऑपरेटर्सना अशा प्रकारच्या व्यवहारांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा प्रकारच्या व्यवहारात ग्राहकाला वेळेवर कापलेले पैसे न मिळाल्यास बँकांना स्वतःच्या खिशातून ते द्यावे लागणार आहेत. यासंबंधी माहिती आरबीआयच्या वेबसाइटवरही देण्यात आली आहे.
ATMमधून पैसे काढणं अन् ऑनलाइन व्यवहाराबाबत मोठी बातमी, RBIने नियम बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 7:01 PM