Join us

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; यंदाच्या आर्थिक वर्षात LIC चा IPO येणार नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:05 PM

रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारतीय शेअरबाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

मुंबई – मागील अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या LIC आयपीओ बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर निराशा पसरणार आहे. LIC चा मेगा IPO पुढील काही दिवसांत येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजेच भारतातील सर्वात मोठी वीमा कंपनी असलेल्या LIC चा आयपीओ आर्थिक वर्ष २०२१-२२ या कालावधीत येण्याची शक्यता नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारतीय शेअरबाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार LIC आयपीओ टाळण्याची शक्यता आहे. परंतु केंद्र सरकारला सेबीकडे कुठलेही नवीन कागदपत्रे दाखल केल्याशिवाय LIC आयपीओ लॉन्च करण्याची मुदत १२ मेपर्यंत आहे. एप्रिलच्या सुरुवातीच्या लिस्टिंगमध्ये ती येण्याची शक्यता नाही. कारण रशिया-युक्रेन युद्ध आजही सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळणार आहेत. NDTV नं ही बातमी दिली आहे.

LIC द्वारे १३ फेब्रुवारी २०२२ ला दाखल केलेल्या प्रस्तावाला सेबीनं मुजंरी दिली होती. त्यामुळे शेअर विक्रीचा मार्ग मोकळा झाला. सरकारने एलआयसीमधील ३१.६ कोटी शेअर म्हणजे ५ टक्के भागीदारी विकण्याची योजना बनवली आहे. ज्यामुळे सरकारच्या तिजोरीत जवळपास ६० हजार कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. दाखल केलेल्या कागदपत्रानुसार, जागतिक मूल्यांकन कंपनी मिलीमॅन एडवायजर्सद्वारे LIC चं मूल्य काढण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कंपनीचं मूल्य ५.४ लाख कोटी रुपये होते.

युक्रेन-रशियाचा फटका मोदी सरकारला बसताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्चमध्ये एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) येईल, अशी घोषणा केली होती. एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर सरकार निर्गुंतवणुकीचं लक्ष्य पूर्ण करेल, असा विश्वास त्यावेळी सीतारामन यांनी व्यक्त केला होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या स्थितीत नाही. एलआयसीचा आयपीओ पुढील आर्थिक वर्षात येण्याची शक्यता वाटत आहे.

टॅग्स :एलआयसी आयपीओशेअर बाजारयुक्रेन आणि रशिया