नवी दिल्ली: तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक HDFC मध्ये असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. बँक ग्राहकांना एक महत्वाचा मेसेज पाठवत आहे. बँकेकडून पाठवण्यात येत असलेल्या मेसेजनुसार 1 जानेवारी 2022 पासून बँकेचे काही नियम बदलणार आहेत. अशा परिस्थितीत खातेदारांना त्याबाबत आवश्यक माहिती दिली जात आहे.
एचडीएफसी बँकेने पाठवेलेल्या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की, 1 जानेवारी 2022 पासून व्यापारी वेबसाइट किंवा अॅपवर सेव्ह केलेले HDFC बँकेचे कार्ड डिटेल्स डिलीट केले जाणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे पाऊल उचलले जात आहे. आरबीआयच्या आदेशानंतर एचडीएफसी बँकेने हा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत आता ही माहिती ग्राहकांना दिली जात आहे.
फसवणूक कमी करण्यासाठी उचलले पाऊल
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक खातेधारकांचे कार्ड तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तुमचे कार्ड तपशील यापुढे व्यापारी वेबसाइट किंवा अॅपवर किंवा Flipkart-Amazon सारख्या शॉपिंग वेबसाइटवर सेव्ह केले जाणार नाहीत. म्हणजेच, प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्याचबरोबर RBI ने ग्राहकांना टोकनचा पर्याय निवडण्याचा पर्यायही दिला आहे.
1 जानेवारी 2022 पासून लागू
आरबीआयच्या सूचनेनंतर आता एचडीएफसीने आपल्या ग्राहकांना ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून कार्ड सेव्ह करण्याची प्रणाली संपुष्टात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, व्यापारी वेबसाइट किंवा अॅपवर आधीपासूनच सेव्ह केलेले कार्ड तपशील हटवले जातील.