नवी दिल्लीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)ने 64 लाख पेन्शन धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. EPFOनं लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात बदल केला आहे. पेन्शन मिळवण्यासाठी आता पेन्शन धारक आपल्या सोयीनुसार कधीही ऑनलाइन पद्धतीनं लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहेत. लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात केलेल्या बदलांमुळे कर्मचारी पेन्शन योजना(EPS), 1995अंतर्गत 64 लाख पेन्शनर्सना फायदा मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं ट्विट करत याची माहिती दिली आहे.
वर्षभरापर्यंत वैध राहणार लाइफ सर्टिफिकेट
पेन्शन धारक आपल्या सुविधेनुसार वर्षभरातल्या कोणत्याही वेळेत ऑनलाइन पद्धतीनं जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करू शकणार आहेत. जीवन प्रमाणपत्र जमा केलेल्या दिवसापासून ते वर्षभरापर्यंत वैध राहणार आहे, अशीही माहिती EPFOनं ट्विट करून दिली आहे. जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) हा पेन्शन धारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. जर ते वेळेत जमा न केल्यास पेन्शन धारकाला पेन्शन मिळणंसुद्धा बंद होऊ शकतं. सद्यस्थितीत पेन्शन धारकांना वर्षातल्या नोव्हेंबर महिन्यात ज्या बँकेत पेन्शन येते, तिथे ते सर्टिफिकेट जमा करावं लागतं. नोव्हेंबरमध्ये संबंधित बँकेत जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा न केल्यास जानेवारीपासून त्याची पेन्शन बंद केली जाऊ शकते. परंतु आता EPFOनं नियमांत बदल केलेले असल्यामुळे वर्षभरात कोणत्याही वेळी आपल्याला लाइफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे. जमा केलेल्या तारखेपासून 12 महिन्यांसाठी ते मर्यादित राहणार आहे.
A pensioner requires Aadhaar Card,PPO Number, Bank Details & Mobile Number during the biometric verification for Digital Life Certificate (Jeevan Pramaan Patra)#EPFO#LifeCertificate#EPS#Pensionerpic.twitter.com/tIXxAukQVy
— EPFO (@socialepfo) March 11, 2020
कसं मिळणार ऑनलाइन लाइफ सर्टिफिकेट?
आता बँक मॅनेजर्स किंवा गॅझेट अधिकाऱ्याच्या मदतीनं लाइफ सर्टिफिकेट तयार करावं लागणार नाही. EPFO कार्यालयात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट करता येणार आहे. तसेच पेन्शन डिस्बर्सिंग बँक, उमंग ऍप किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून लाइफ सर्टिफिकेट जमा करता येईल. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आधार कार्ड नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक अकाऊंट डिटेल्स आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर असणं आवश्यक आहे.
CSC, बँका आणि सरकारी ऑफिसेजद्वारे चालवण्यात येणाऱ्या जीवन प्रमाण सेंटरच्या माध्यमातून डिजिटल लाइफ सर्टिफिकेशनसाठी नोंदणी केली जाऊ शकते. कॉम्प्युटर, मोबाइल किंवा टॅबलेटवर क्लाइंट एप्लिकेशन डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. याची पूर्ण माहिती jeevanpramaan.gov.inवर उपलब्ध आहे.