Join us

गौतम अदानींना न्यायालयाकडून मोठा दिलासा, शेअर्समध्ये बंपर तेजी; खरेदीसाठी उड्या, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:47 IST

Adani Enterprises SFIO case: सीरिअस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसनं (SFIO) २०१२ मध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) आणि त्याचे प्रवर्तक गौतम अदानी, राजेश अदानी यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणं आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.

Adani Enterprises SFIO case: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी मोठा दिलासा मिळाला. सुमारे ३८८ कोटी रुपयांच्या बाजार नियमांचं कथित उल्लंघन केल्याच्या आरोपातून उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. सीरिअस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसनं (SFIO) २०१२ मध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) आणि त्याचे प्रवर्तक गौतम अदानी, राजेश अदानी यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणं आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.

2019 मध्ये या दोन्ही उद्योगपतींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच वर्षीचा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती. सत्र न्यायालयानं त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यास नकार दिला. आर. एन. लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकलपीठानं सोमवारी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द बातल ठरवत दोघांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

२०१२ मध्ये आरोपपत्र दाखल

डिसेंबर २०१९ मध्ये उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती आणि त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली. २०१२ मध्ये एसएफआयओनं अदानी यांच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणं आणि फसवणुकीचा आरोप करत आरोपपत्र दाखल केलं होतं, परंतु मे २०१४ मध्ये मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. एसएफआयओनं निर्दोष मुक्ततेच्या आदेशाला आव्हान दिलं होतं.

सत्र न्यायालयानं आदेश रद्द केला

२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये, सत्र न्यायालयानं दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. हा आदेश रद्दबातल ठरवाताना सत्र न्यायालयानं, SFIO नं अदानी समूहाविरोधात अवैध लाभाचा मुद्दा विचारात घेतला होता असं म्हटलं होतं. या प्रकरणात सुमारे ३८८ कोटी रुपयांच्या बाजार नियमन उल्लंघनाचा आरोप होता. एसएफआयओच्या तपासादरम्यान नियामक अनुपालन आणि आर्थिक व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण उद्भवलं होतं.

समूहाच्या शेअर्समध्ये वाढ

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये २.९२ टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय अदानी एंटरप्रायझेस (२.८६ टक्के), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (२.५७ टक्के) आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स (२.१४ टक्के) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर अदानी विल्मर (१.२३ टक्के), अदानी पॉवर (१.१८ टक्के), अदानी टोटल गॅस (१.१३ टक्के), एनडीटीव्ही (१.२८ टक्के), अंबुजा सिमेंट्स (१.६७ टक्के) आणि एसीसी (१.४७ टक्के) या अदानी समूहाच्या शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार