लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी मांडलेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. व्याजदर स्थिर राहणार असल्याने कर्जाच्या हप्त्यात कोणतीही वाढ होणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत ६, ७ व ८ जून रोजी झाली. त्यानंतर व्याजदर ‘जैसे थे’ राखण्याची घोषणा दास यांनी केली.
वर्षभर दरवाढ नाही?
- चलनवाढ रोखण्यासाठी गेल्या वर्षीच्या सर्व पतधोरणांमध्ये आरबीआयने व्याजदरात वाढ केली होती.
- मात्र, त्याची परिणामकारकता दिसत असल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
- गेल्या दोन पतधोरणाच्या माध्यमातून व्याजदरवाढीला आरबीआयने ब्रेक दिला. हाच ट्रेन्ड आगामी वर्षभर तरी दिसेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
६.५% विकासदर?
दरम्यान, आगामी काळात देशात चलनवाढ ५.१ टक्क्यांवर राहील, तर विकासदर ६.५ टक्के असेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
‘५००ची नोट कायम राहणार’
५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा किंवा १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा आणण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे लोकांनी कोणतेही अंदाज बांधू नयेत, असे आवाहन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले.