लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळास (एलआयसी) १० टक्के ‘सार्वजनिक समभाग धारकते’च्या (पब्लिक शेअरहोल्डिंग) नियमाची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त ३ वर्षांची मुदत बाजार नियामक सेबीने दिली. या घोषणेनंतर एलआयसीचे समभाग बुधवारी जोरदार उसळून ९९९ रुपयांवर पोहोचले.
सेबीने नियम १९ (ब) अनुसार १० टक्के सार्वजनिक समभाग धारकतेसाठी ३ वर्षांची मुदतवाढ १४ मे रोजी दिली. याच्या पूर्तीसाठी आता एलआयसीला १६ मे २०२७ पर्यंतची मुदत मिळाली. या निर्णयाची माहिती बाजारात येताच एलआयसीच्या समभागांत सुमारे ७ टक्के तेजी आली.
सेबीचा नियम काय?
कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर आधी १० टक्के व नंतर एकूण २५ टक्के समभाग लोकांसाठी खुले करणे आवश्यक आहे. २५ टक्के समभाग लोकांसाठी खुले करण्याची मुदत ५ वर्षे आहे. त्यासाठी एलआयसीला सरकारने सवलत देऊन १० वर्षांची म्हणजेच २०३२ पर्यंतची मुदत दिली. १० टक्के समभाग खुले करण्याची मुदत मात्र संपत आली होती. तिला आता सेबीने मुदतवाढ दिली आहे.