नवी दिल्ली - निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची या कंपन्यांची योजना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पुन्हा तिसरा कार्यकाळ मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या उत्साहवर्धक वातावरणाचा अधिकाधिक कंपन्या लाभ उठविण्यास उत्सुक आहेत. वास्तविक, बँकरांचे म्हणणे आहे की, इक्विटी निर्देशांक नवीन उच्चांकावर असताना तसेच अनेक समभागांचे मूल्य खूपच वाढलेले असताना गुंतवणूकदार नवीन समभाग खरेदी करण्यास उत्सुक आहेत.
आयपीओ कुणाचे? अनेक कंपन्यांचे आयपीओ प्रतीक्षेत आहेत. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एमक्योर फार्मास्युटिकल्स, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स, आशीर्वाद मायक्रोफायनान्स, स्टेनली लाइफस्टाइल, वारी एनर्जीज, प्रीमियर एनर्जीज, शिवा फार्माकेम, बन्सल वायर इंडस्ट्रीज, वन मोबिक्विक सिस्टम्स आणि सीजे डार्कल लॉजिस्टिक्स यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्या पुढील दोन महिन्यांत आयपीओ बाजारात उतरविणार आहेत.
पहिल्याच आयपीओला मिळाला प्रचंड प्रतिसाद ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ‘इक्सिगो’चा आयपीओ सोमवारी बाजारात आला होता. त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की, काही तासांतच तो संपूर्ण सब्स्क्राइब झाला. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला आयपीओ होता. हा आयपीओ ७४० कोटी रुपयांचा आहे.
यामुळे गुंतवणूकदार आहेत उत्साहात‘कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग’चे एमडी व्ही. जयशंकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पुनरागमनामुळे बाजार उत्साहित आहे. पायाभूत सुविधा व देशांतर्गत वस्तू उत्पादन वाढीस सरकारकडून समर्थन दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार उत्साहात आहेत.