Join us

Go Firstला मोठा धक्का! विनंतीचा काही उपयोग नाही, २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 4:44 PM

गो फर्स्ट कंपनीने विमानोड्डाणे स्थगित केली तेव्हा कंपनीकडे सुमारे ७०० वैमानिक होते.

Go First Crisis: स्वतः आर्थिक दिवाळखोरी घोषित केलेल्या गो फर्स्ट या वाडिया समूहाच्या नागरी विमान कंपनीला एकामागून एक धक्के बसत आहेत. वैमानिक तसेच कर्मचारी सोडून जाऊ नयेत, यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. कर्मचाऱ्यांना नोकऱ्या न सोडण्याचे आवाहन केले जात आहे. मोठ्या पगाराची ऑफर दिली जात आहे. मात्र, अशातच या विनंतीचा काही उपयोग होताना दिसत नाही. गो फर्स्टचे सुमारे २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू झाल्याचे सांगितले जात आहे.  

कंपनी पुन्हा सुरू करतेवेळी वैमानिकांची चणचण भासू नये याकरिता गो फर्स्ट कंपनीने आपल्या वैमानिकांना मासिक वेतनाखेरीज दरमहा १ लाख रुपये अधिकचे देण्याची घोषणा केली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्यासाठी आणि कंपनीची दिशा सांगण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना एक ई-मेल लिहिला आहे. वैमानिकांना पगाराखेरीज प्रतिमहिना १ लाख रुपये देण्यात येणार आहेत, तर फर्स्ट ऑफिसर किंवा को-पायलटला पगाराखेरीज प्रति महिना ५० हजार रुपये देण्याचे कंपनीने सांगितले आहे.

२०० वैमानिकांनी एअर इंडियाचे दरवाजे ठोठावले

गो फर्स्टच्या वैमानिकांपैकी २०० वैमानिकांनी एअर इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत. या वैमानिकांना एअर इंडिया नोकरीची ऑफर दिली असून त्यांनी ती स्वीकारली असल्याचे रॉयटरचे म्हणणे आहे. यापैकी ७५ वैमानिकांचे एअर इंडियामध्ये प्रशिक्षणही सुरू झाले आहे. तत्पूर्वी, गो फर्स्ट कंपनीने विमानोड्डाणे स्थगित केली तेव्हा कंपनीकडे सुमारे ७०० वैमानिक होते. सध्या कंपनीमध्ये ५०० वैमानिक उरले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विमानोड्डाणे पुन्हा सुरू केल्यास ५०० वैमानिक पुरेसे होतील, असा दावा गो फर्स्टने केला आहे.

वैमानिकांसाठी रिटेन्शन अलाउन्स घोषित

गो फर्स्टने वैमानिकांसाठी रिटेन्शन अलाउन्स घोषित केला. ३१मे पर्यंत कंपनीच्या पे रोलवर असलेल्या वैमानिकांना हा अलाउन्स देण्यात येईल. त्याचप्रमाणे राजीनामा दिलेल्या वैमानिकांनी १५ जूनपर्यंत त्यांचा राजीनामामागे घेतल्यास त्यांनाही हा अलाउन्स मिळेल.  याखेरीज कंपनीत अनेक वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष बोनसही देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. 

दरम्यान, २०२३-२४ या आर्थिक वर्षात इंडिगो कंपनीने पाच हजार कर्मचाऱ्यांची भरती करायचे ठरवले आहे. अकासा एअर कंपनी एक हजार जणांची भरती करण्यासाठी लायक माणसे शोधत आहे. एअर इंडियाने यावर्षी ४,२०० केबिन क्रू आणि ९०० वैमानिक घ्यायचे ठरवले आहे.

 

टॅग्स :एअर इंडियागो-एअर