नवी दिल्ली - अमेरिकी कार निर्मिती क्षेत्रातील अव्वल कंपनी टेस्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया अभियानाला जोरदार धक्का दिला आहे. टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनी आपल्या कंपनीचा अमेरिके बाहेरील पहिला कारखाना चीनमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. द वॉल स्ट्रीट जनरलच्या वृत्तानुसार, शांघायमध्ये उत्पादन केंद्र सुरु करण्याची त्यांनी तयारी केली आहे. यापूर्वी भारतात उत्पादन प्रकल्प सुरु करणार असल्याचे टेस्लाने म्हटले होते पण आता त्यांनी चीनसोबत करार केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया अभियानाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.
या वर्षी जून महिन्यात टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनी भारत सरकारसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. मात्र उत्पादन प्रकल्प सुरु करताना आयातीशी संबंधित दंड आणि नियमांमधून सूट देण्याचा आग्रह टेस्लाने धरला होता, असे वृत्त ‘मनी कंट्रोल’ या संकेतस्थळाने दिले आहे. वर्ष 2030 पर्यंत सर्व गाड्या इलेक्ट्रिकवर चालवण्याचे प्रयत्न भारताकडून सुरु आहेत. याचे टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनी कौतुक केले होते. त्यामुळेच भारतात उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी टेस्लाला ऑटोमाबाईल क्षेत्रातील एखाद्या भारतीय कंपनीसोबत उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. याआधी पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये टेस्लाच्या फ्रिमोंट येथील कारखान्याला भेट दिली होती. मात्र ‘मेक इन इंडिया’मधील काही अटींवरुन मस्क यांची भारत सरकारसोबतची बोलणी फिस्कटली. परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन प्रकल्प सुरु करायचा असल्यास त्यासाठी आवश्यक असलेले ३० टक्के सुटे भाग भारतातून घेण्यात यावे, अशी अट आहे. मात्र ही अट टेस्लाला मान्य नव्हती. त्यामुळेच टेस्लाने भारताकडे पाठ फिरवत चीनमध्ये उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. टेस्लाला चीनकडून आयात शुल्कात मोठी सवलत देण्यात आली आहे. चीनने अनेक सवलती दिल्याने टेस्लाने चीनला प्राधान्य दिले.