Join us  

Gautam Adani Group: नुकसान थांबता थांबेना! आणखी एक मोठी डील हातातून गेली; अदानी समूहाला तिसरा धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:54 PM

Gautam Adani Group: एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत असून, दुसरीकडे मोठ्या डील्स हातातून निसटून जात आहेत.

Gautam Adani Group: अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागत आहे. यातून कंपनी अद्यापही सावरलेली दिसत नाही. एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरत असून, दुसरीकडे मोठ्या डील्स हातातून निसटून जात आहेत. अलीकडेच डीबी पॉवर कंपनीचे अधिग्रहण करण्याचा करार अदानी समूह पूर्ण करू शकला नाही, त्यातच आता आणखी एक करार हातातून गेल्याचे सांगितले जात आहे. 

२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला हा तिसरा मोठा धक्का आहे. प्रथम, त्यांनी DB पॉवर खरेदी करण्याचा करार पूर्ण केला नाही आणि नंतर PTC India साठी बोली लावण्यापासून ते मागे हटले. यातच बुधवारी अदानी पॉवरचा समभाग पाच टक्क्यांनी घसरून १६२.४५ रुपयांवर बंद झाला. यानंतर आता सीके बिर्ला समूहाची कंपनी ओरिएंट सिमेंटने (Orient Cement) अदानी पॉवर  महाराष्ट्र कंपनीशी (Adani Power Maharashtra) होत असलेला करार रद्द केला आहे. 

अदानी समूह या करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरला

आधीच अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. सीके बिर्ला समूहाची कंपनी ओरिएंट सिमेंटने अदानी पॉवर महाराष्ट्र कंपनीसोबतचा करारच रद्द केला आहे. अदानी समूह या करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरला, असे ओरिएंट समूहाने म्हटले आहे. ओरिएंट सिमेंटने सप्टेंबर २०२१ मध्ये अदानी समूहासोबत सामंजस्य कराराची घोषणा केली होती. अदानी पॉवरने हा करार न करण्याची विनंती केली आहे. यानंतर आता ओरिएंट सिमेंटचा शेअर दोन टक्क्यांनी घसरून ११७.३५ रुपयांवर बंद झाला.

दरम्यान, हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूह चांगलाच हादरला आहे. यामुळे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाचे मार्केट कॅप १४२ अब्ज डॉलरने घसरले आहे. आता त्यांचे लक्ष पूर्णपणे रोख बचत आणि कर्ज कमी करण्यावर आहे. याच कारणामुळे समूहाने प्रथम DB पॉवर बरोबर करार केला नाही आणि नंतर PTC India Ltd साठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अदानीगौतम अदानी