नवी दिल्ली - जर तुम्ही अॅक्सिस बँकेचे (Axis bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. आता अॅक्सिस बँकेमधून रोख रक्कम काढणे महाग होणार आहे. (Banking Sector) बँकेने बचत खात्यामधून रोख रक्कम काढण्यावरील तसेच एसएमएस शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेले दर १ मे २०२१ पासून लागू होणार आहेत. (A big shock to the customers, it became expensive to withdraw cash from Axis bank, SMS charges increased, many rules also changed)
अर्थविषयक बातम्या देण्याऱ्या मनी कंट्रोलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १ मे २०२१ पासून अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामध्ये सरासरी किमान १५ हजार रुपये ठेवावेच लागतील. सद्यस्थितीत ही मर्यादा १० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय बँकेने प्राइम आणि लिबर्टी बचत खात्यामध्ये सरासरी किमान ठेवीची मर्यादा १५ हजार रुपयांवरून वाढवून २५ हजार रुपये केली आहे.
अॅक्सिस बँकेने आपल्या बचत खातेधारकांना एका महिन्यात चार ट्रांझॅक्शन किंवा दोन लाख रुपये विनाशुल्क काढण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानंतर रोख रक्कम काढण्यासाठी बँकेकडून दर एक हजार रुपयांमागे पाच रुपये किंवा कमाल १५० रुपयांची आकारणी केली जाते. आता बँकेने फ्री ट्रांझॅक्शननंतर लागणारे ५ रुपयांचे शुल्क वाढवून दहा रुपये केले आहे. मात्र कमाल १५० रुपयांचे शुल्क कामय ठेवले आहे. तसेच खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास ५० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंतच्या शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे.
याशिवाय आता बँकेने २५ पैसे प्रति एसएमएसच्या दराने शुल्क वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बँकेकडून पाच रुपये दरमहा एवढी आकारणी केली जाते. दरम्यान एसएमएसबाबतचा नवा दर १ जुलैपासून लागू होणार आहे. यामध्ये बँकेकडूव पाठवले जाणारे ओठीपी आणि प्रमोशनल एसएमएस यांचा समावेश नसेल.
दरम्यान, अॅक्सिस बँकेने सॅलरी अकाऊंटच्या नियमांमध्येही बदल केला आहे. जर तुमचे सॅलरी अकाऊंट ६ महिन्यांपेक्षा अधिक जुने असेल आणि कुठल्याही एका महिन्यात कुठल्याही प्रकारचे क्रेडिट झाले नाही तर दरमहा १०० रुपये एवढी आकारणी केली जाईल. तर तुमच्या खात्यामधून १७ महिने कुठल्याच प्रकारचा व्यवहार झाला नाही. तर १८ व्या महिन्यात वन टाइम १०० रुपये चार्ज आकारला जाईल.